Join us

शंभर मुलांपैकी एक जण असतो स्वमग्न!

By admin | Published: April 03, 2016 3:52 AM

देशात जन्माला येणाऱ्या १०० मुलांपैकी १ किंवा २ मुले स्वमग्न असू शकतात. हा एक आजार आहे. पण स्वमग्नता म्हणजे गतिमंद नाही, हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मुंबई : देशात जन्माला येणाऱ्या १०० मुलांपैकी १ किंवा २ मुले स्वमग्न असू शकतात. हा एक आजार आहे. पण स्वमग्नता म्हणजे गतिमंद नाही, हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. २ एप्रिल हा दिवस स्वमग्नता जनजागृती दिन म्हणून पाळला जातो. स्वमग्न असणारी मुले ही आपल्याच विश्वात रमलेली असतात. त्यांना लोकांशी संवाद साधताना अडचणी येतात. पण याचा अर्थ त्यांची आकलन क्षमता कमी आहे, असा लावला जातो. या मुलांना काही कळत नाही, त्यांची बौद्धिक क्षमता कमी आहे, असा विचार करूनच त्यांना डॉक्टरांकडे आणले जाते. स्वमग्न मुलांच्या पालकांना त्यांची मुले ओझे वाटतात. हे अत्यंत चुकीचे आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. या व्यक्ती एकट्या राहतात. त्यांना समाजात मिसळायला आवडत नाही. ते दुसऱ्यांशी संवाद साधत नाहीत. अनेकदा आपल्या विचारात असताना ही मुले सतत हालचाल करणे, एकटक पाहत राहणे अशा गोष्टी करतात. अनेकदा ही मुले पालकांशी संवाद साधत नाहीत. पालकांनी लाडाने जवळ बोलावून ही मुले त्यांच्या भावंडांबरोबर खेळत नाहीत. त्यांना आवडणाऱ्या काही तरी वेगळ्या गोष्टी करत असतात. त्यामुळे पालकांचा तणाव वाढतो. पालकांनी घाबरून जाऊ नये. या मुलांमध्ये कौशल्य नैसर्गिकरीत्या विकसित होत नाहीत. त्यांना प्रशिक्षण द्यावे लागते. साध्या गोष्टी त्यांना शिकवाव्या लागतात. त्यांच्या आवडीच्या गोष्टीत ते चांगली प्रगती करू शकतात. त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग सेंटरमध्ये नेले पाहिजे. त्यामुळे या मुलांची प्रगती चांगली होईल.- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ