लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पर्यावरणाच्या संवर्धन आणि ऊर्जा बचतीसाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. उपनगरीय मार्गावर १०२ रेल्वेस्थानकांवर शंभर टक्के विद्युत एलईडी दिवे बसवलेले आहेत. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक ९ लाख १२ हजार विजेच्या युनिट्ससह १ कोटी १० लाख रुपयांची बचत होणार आहे.
मध्य रेल्वेकडून मागील काही वर्षांपासून ऊर्जा बचत, ऊर्जा संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. कमी विजेचा वापर करून जास्तीत जास्त स्वच्छ प्रकाश देण्यावर मध्य रेल्वेकडून प्रयत्न केला जात आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर असलेले, ४३२ रेल्वेस्थानकांवर ५७ हजार ५५२ एलईडी दिवे, तर २ हजार ६५० रेल्वे निवासी क्वार्टर कार्यशाळा आणि इतर कार्यालयांमध्ये ८१ हजार ७६६ एलईडी दिवे बसविण्यात आलेले आहेत. यात मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ या विभागांचा समावेश आहे. दरवर्षी मध्य रेल्वेची एलईडी दिव्यामुळे ७ कोटी ५९ लाख रुपयांची बचत होत आहे.
कोरोना काळात कमी लोकल फेऱ्या आणि कमी प्रवासी पाहता एलईडी दिव्यांच्या कामाला गती दिली. स्वच्छ प्रकाशाबरोबर विजेची आणि पैशाची बचत या दृष्टीने एलईडी दिव्यांची व्यवस्था महत्त्वाची आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अशी व्यवस्था उपनगरी यातील प्रत्येक स्थानकावर करण्यात आलेली आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल मार्गावरील १०२ रेल्वेस्थानकांवर डिसेंबर २०२० मध्ये शंभर टक्के एलईडी दिवे बसविण्यात आले. या आर्थिक वर्षात ९ लाख १२ हजार विजेच्या युनिट्समधून एक कोटी १०लाख रुपयांची बचत होणार आहे.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे