मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षणाबाबत नेहमी प्रश्न उपस्थित केले जात असताना पालिकेच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. दहावीच्या निकालात मुंबई महापालिकेच्या शाळांचा निकाल ९९.९७ टक्के लागला आहे. मागील नऊ वर्षांतील पालिकेच्या शाळांचा हा सर्वाधिक चांगला निकाल ठरला आहे. पालिकेच्या २१८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळांनीही आपला दर्जा अबाधित असल्याचे दाखवून दिले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आठ माध्यमांच्या २२२ माध्यमिक शाळांमधून एस. एस. सी. परीक्षा २०२१ साठी १५ हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. प्राप्त निकालानुसार सद्यस्थितीत २१८ शाळांचा निकाल १०० टक्के असून, उर्वरित चार शाळांमधील प्रत्येकी एक विद्यार्थ्याचा निकाल मंडळ स्तरावर प्रलंबित आहे. १५ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने मनपा शाळांच्या निकालाची टक्केवारी ९९.९७ इतकी असल्याचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी स्पष्ट केले. एस. जी. बर्वेनगर एम. पी. एस. इंग्रजी माध्यमिक शाळा, घाटकोपरमधील मोहित भिकुभाई गोहिल या विद्यार्थ्याने ९८.६० टक्के गुण संपादन करत मनपाच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. चारकोप सेक्टर-१ एम. पी. एस. हिंदी माध्यमिक शाळा, कांदिवली या शाळेच्या लक्ष्मी रामलाल कोरी या विद्यार्थिनीने ९७.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन मनपा शिक्षण विभागाने एस.एस.सी. निकाल वाढीसाठी ‘पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती’ करून शिक्षकांनी ऑनलाइन व ऑफलाइन शिकवण्या नोव्हेंबरपूर्वी पूर्ण केले. तसेच राज्यस्तरीय ‘झूम व यू-ट्यूब चॅनेल्सची निर्मिती’ करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. शिकवून झालेल्या भागावर ऑनलाइन ‘साप्ताहिक परीक्षा’ तसेच दरमहा ‘वर्कशीटची निर्मिती’ करून विद्यार्थ्यांकडून सोडवून तपासून देण्यात आल्या.
‘मिशन-३५’ पुस्तिकेची निर्मिती
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात ८० पैकी किमान ३५ गुण मिळावेत, यासाठी अत्यंत सोप्या व मोजक्या आशयाची निर्मिती करून ‘मिशन-३५’ पुस्तिकेची निर्मिती करून विद्यार्थ्यांना वाटप करून सोडवून व तपासून देण्यात आल्या. याशिवाय अधिकाऱ्यांना सर्व ‘शाळा दत्तक’ देऊन शाळांना मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांसाठी ‘ऑनलाइन कार्यशाळा’ व विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन विशेष व्याख्यानमाला व प्रेरणादायी कार्यक्रम’ आयोजित करण्यात आले होते.
कोट
पालिका शाळांचा निकाल हा मागील काही वर्षे सातत्याने उंचावत आहे. नियमित शाळांप्रमाणे पालिका शाळांतील विद्यार्थीही राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेत उत्तम कामगिरी बजावून दाखवत आहेत. त्यामुळे साहजिकच पालिका शाळांतील शिक्षणाचा दर्जाही उंचावला असून, तो अबाधित राखण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
- महेश पालकर, शिक्षणाधिकारी, पालिका शिक्षण विभाग