मुंबई : मान्सूनने विश्रांती घेतली असली तरीदेखील मुंबई शहर आणि उपनगरात पडझडीच्या घटना घडतच आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईच्या उपनगरातील पवई आणि जोगेश्वरी येथे बांधकामाचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटनांत एकूण ७ जण जखमी झाले. सातही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, जखमींची प्रकृती स्थिर आहे.पवई येथील तुंगा गावातील रुची हॉटेलच्या मागील बाजूस तळमजला अधिक एक अशा बांधकामाच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले. येथील दुर्घटनेतील सहाही जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तमजाद आलम, वहिद खान, नसीम खान, मुझाहिद शेख, साहिदा खान, तेंजर खान अशी या सहा जखमींची नावे असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.दुसरी घटना जोगेश्वरीत घडली. येथील एस.व्ही. रोडवरील ग्रेस प्लाझासमोरील फिरदोस पार्कलगतच्या एका खोलीच्या प्लास्टर आॅफ पॅरिसचा भाग कोसळला. या दुर्घटनेत मोहम्मद सिद्दिकी (८५) हे ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. कूपर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
बांधकामाचा भाग कोसळून ७ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 6:49 AM