Join us

भांडुपमध्ये अपघातात एकाचा मृत्यू; ‘तो’ १५ मिनिटे रक्ताच्या थारोळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 3:45 AM

बस आल्यामुळे ३० जण वाचले : बघे छायाचित्र काढण्यात दंग

मुंबई : भांडुपच्या नरदास नगर परिसरात घडलेल्या विचित्र अपघातात एका तरुणाला प्राण गमवावा लागला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर तो १५ मिनिटे मदतीच्या प्रतीक्षेत होता. बघ्यांनी मदतीऐवजी फोटो आणि व्हिडीओ काढण्याला पसंती दिली. उशिराने, तेथील स्थानिकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने तरुणाला रुग्णालयात नेले. तोपर्यंत त्याचा मत्यू झाला.

रविवारी दुपारच्या सुमारास मातीने भरलेला डंपर नरदास नगर येथील टेंभीपाडा रोडच्या चढणीवर असताना, अचानक त्याचे नियंत्रण सुटले. तो उतारावरून खाली येत, थेट एका टेम्पोला आदळला. आणि त्या टेम्पोच्या धडकेत तेथे असलेल्या भंगार विक्रेता तरुण विरेंद्र चव्हाण येथीलच पांडवकुंड इमारतीच्या सुरक्षा भिंतीवरुन खाली कोसळला. याच दरम्यान तेथे पोहचलेल्या बेस्ट चालकाने, कोंडी सोडविण्यासाठी बेस्ट खाली थांबवली. डम्परमध्ये बसून, तो वर चढविण्याचा प्रयत्न केला. हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढली. त्याच दरम्यान पुन्हा तोल गेल्याने बेस्ट चालक डम्परसहीत खाली उभ्या असलेल्या बेस्टवर धडकला. आधीच प्रवाशांना खाली उतरविले असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तर, बस आडवी आल्यामुळे बघ्यांच्या गर्दीतले २५ ते ३० जण थोडक्यात बचावले. याच दरम्यान नागरिक मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडीओ काढून शेअर करण्यात दंग होते. त्याच दरम्यान जखमी अवस्थेत पडलेल्या विरेंद्रला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. ही बाब समजताच स्थानिक अजिंक्य भोसले हा तरुण तेथे आला. त्याने, जखमीला रुग्णालयात नेले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याला वेळीच रुग्णालयात आणले असते तर, तो वाचला असता. तो तब्बल १५ मिनिटे रक्ताच्या थारोळ्यात पडून होता असे भोसलेने सांगितले. डम्पर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे़ 

टॅग्स :मृत्यूमुंबई