कसारा घाटातील अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:06 AM2021-01-10T04:06:37+5:302021-01-10T04:06:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसारा : मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात शनिवारी साडेअकराच्या सुमारास ट्रेलर कंटेनर व टेम्पोचा अपघात झाल्याने एक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा : मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात शनिवारी साडेअकराच्या सुमारास ट्रेलर कंटेनर व टेम्पोचा अपघात झाल्याने एक जण ठार तर चौघे जखमी झाले.
नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात येणारा कंटेनर कसारा घाट उतरत असताना, घाटात चालक पिंटू कुमार याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने घाबरून सुरू असलेल्या कंटेनरमधून उडी मारली. हा कंटेनर सुमारे ४०० मीटर विनाचालक पुढे आला व पुढे वळणावर असलेल्या कामगारांच्या टेम्पोला धडकला. यात कंटेनरवरील दोन महाकाय ट्रॉली खाली पडल्या व कंटेनरच्या चालकाची केबिन वेगळी झाली. या अपघातात रस्त्याचे दुरुस्ती काम करणाऱ्या टेम्पोमधील सुनील काळू भगत हा ठार झाला, तर बाळू काळू कामडी व अन्य तीन जण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, महामार्ग पोलीस अधिकारी अमोल वालझाडे, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भोये तसेच पिक इन्फ्रा पेट्रोलिंग टीम व पोलीस कर्मचारी घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दखल करण्यात आले असून, पुढील तपास कसारा पोलीस करीत आहेत.
...अन्यथा मोठा अनर्थ घडला असता
भरधाव वेगात विनाचालक घाट उतरणारा कंटेनरचा अपघात झाला, त्या वेळी कंटेनरच्या पुढे टेम्पो वगळता अन्य वाहने नव्हती. शनिवारी महामार्गावर वाहनांची गर्दी होती, जर कंटेनरच्या पुढे छोट्या कार असत्या, तर मोठा अनर्थ झाला असता.
फोटो आहे : ०९ कसारा अपघात
फोटो ओळ : कसारा घाटात शनिवारी झालेल्या अपघातात कंटेनरवरील खाली पडलेल्या महाकाय ट्रॉली. (छाया : श्याम धुमाळ)