मुंबई : कुलाबा येथील तळमजला अधिक चार मजली चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रविवारी दुपारी आग लागून एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली. श्याम अय्यर (५४) असे मृताचे नाव असून, युसुफ पूनावाला या जखमीवर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर दुसरा जखमी भुरमल संतोष पाटील हा अग्निशमन दलाचा जवान असून, त्याच्यावर १०८ या रुग्णवाहिकेत उपचार करण्यात आले.
मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास कुलाबा येथील तळमजला अधिक चार माळ्यांच्या चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसºया मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासह इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना तातडीने बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. एकूण १४ लोकांना या दुर्घटनेतून बाहेर काढण्यात आले. दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील लोकांना वाचविण्यासाठी अग्निशमन दलाच्या उंच शिडीचा वापर करण्यात आला. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र, त्यावर मात करत अग्निशमन दलाच्या जवानांनी दुर्घटनाग्रस्तांना इमारतीमधून सुखरूप बाहेर काढले. दुपारी चारच्या सुमारास आग पूर्णत: विझल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. जुनी इमारत, निमुळते जिने आणि पसरलेल्या धुरासह आगीच्या ज्वाळामुळे बचावकार्यात अडथळे आले. महत्त्वाचे म्हणजे, रविवारी रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने अग्निशमन दलास वेगाने घटनास्थळी पोहोचता आले.
दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या खिडक्यांना जाळ्या नसल्याने, अग्निशमन दलाच्या जवनांना सहज आत प्रवेश करता आला आणि बचावकार्य वेगाने करता आले. मुळात हेरिटेज इमारत किंवा जुन्या इमारतींमध्ये लाकूड काम अधिक असते. परिणामी, अग्निशमन दलास आग विझविताना अडथळ्यांना सामोरे जावे लागते. इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर, तिसºया मजल्यावरील घरातील साहित्य जळून खाक झाले. जिन्यांवर मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने आणि आगीच्या ज्वाळा पसरल्याने ५ लोकांना खूप त्रास झाला. घटनास्थळीच त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. दोघांना उंच शिडीच्या मदतीने खाली उतरविण्यात आले. आणखी तिघांना शिडीच्या मदतीने खाली उतरविण्यात आले.