सव्वाशे रुपयांवरून एकाची हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:19 AM2017-08-01T03:19:51+5:302017-08-01T03:20:00+5:30
आइसक्रीमच्या सव्वाशे रुपयांवरून झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली. हा प्रकार रविवारी रात्री साकीनाका परिसरात घडला.
मुंबई : आइसक्रीमच्या सव्वाशे रुपयांवरून झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली. हा प्रकार रविवारी रात्री साकीनाका परिसरात घडला. या प्रकरणी दहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
मुजाहीद जावेद सुलतान (२१), जाहिद जावेद सुलतान (२१), शोएब सिद्दीकी (१९) आणि मोबिन सुलतान (३०) अशी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. यात शोएब वगळता, अन्य तिघे व्यवसायाने वाहनचालक आहेत. साकीनाका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री खैरानी रोडच्या यादवनगर परिसरात मुजाहीद म्हणजे मुज्जू हा त्याच्या मित्रासोबत एका दुकानात आइसक्रीम आणण्यासाठी गेला. आइसक्रीम घेतल्यावर त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली, तेव्हा आधीचेदेखील काही पैसे मुज्जूचे दुकानदाराला देणे होते. त्यामुळे त्याने आइसक्रीमचे सव्वाशे रुपये मुज्जूकडे मागितले, त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाले. मुझम्मील हसन शेख नावाची व्यक्ती दुकानाशेजारीच उभी होती. त्यामुळे त्यांनी हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुज्जू आणि त्याच्या मित्रांनी शेख यांच्यासोबतही हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ज्यात शेख यांनी मुज्जूच्या श्रीमुखात भडकाविली. त्यामुळे मुज्जू आणि त्याच्या साथीदारांनी बांबूने शेख यांना बेदम मारहाण केली आणि ते जागीच बेशुद्ध पडले.
या सर्व प्रकाराची माहिती साकीनाका पोलिसांना मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत, शेखना राजावाडी रुग्णालयात पाठविले. तेथे डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले. यात अब्दुल रफीक मोहम्मद शाह हेदेखील भांडण सोडविताना जखमी झाले. त्याच्या डोक्याला किरकोळ मार लागला आहे, त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली.