घरगुती वादातून चेंबूर येथे भर रस्त्यात एकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:07 AM2021-02-12T04:07:16+5:302021-02-12T04:07:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काकांनी विकलेल्या घराचा अर्धा हिस्सा आपल्याला न दिल्याच्या राग मनात ठेवून एकाने आपल्या चुलत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काकांनी विकलेल्या घराचा अर्धा हिस्सा आपल्याला न दिल्याच्या राग मनात ठेवून एकाने आपल्या चुलत भावाची भर रस्त्यात हत्या केल्याचा प्रकार बुधवारी रात्री चेंबूर येथे घडला. प्रफुल्ल सुभाष सवणे (२५) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या हत्येच्या निषेधार्थ गुरुवारी चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाशांनी चेंबूरच्या पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. जोपर्यंत प्रफुल्लच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी यावेळी रहिवाशांनी केली. यावेळी सिद्धार्थ कॉलनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मृत प्रफुल्लचे वडील आपल्या भावासह चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील घरात अनेक वर्षांपासून राहत होते. प्रफुल्लच्या काकांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर काकांची पत्नी आपल्या मुलासह दुसरीकडे राहण्यास गेली. दोन वर्षांपूर्वी प्रफुल्लच्या वडिलांनी सिद्धार्थ कॉलनीतील आपले राहते घर विकून ते दुसरीकडे राहण्यास गेले. परंतु या विकलेल्या घराचा अर्धा हिस्सा आपल्याला मिळायला हवा यावरून दोन्ही कुटुंबामध्ये वाद सुरू होता. आपल्याला हिस्सा न दिल्याचा राग मनात ठेवून प्रफुल्लचा चुलत भाऊ अनिकेत सवणे याने त्याच्या साथीदारांसह बुधवारी रात्री प्रफुल्लचा कुर्ला सिग्नल येथून पाठलाग केला.
यानंतर आरोपींनी प्रफुल्लला चेंबूरच्या स्वस्तिक पार्क येथे गाठून त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला प्रफुल्ल मला वाचवा अशी विनवणी करत होता. यानंतर प्रफुल्लला त्याच्या मित्रांनी उपचारांकरिता रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिद्धार्थ कॉलनी येथील रहिवाशांनी गुरुवारी चेंबूरच्या पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत सवणे, बॉबी कांबळे, अमीर शेख व नवदित सोनवणे यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.