Join us

कोरोनावरील एक लाख ३९ हजार ५०० लस मुंबईत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनावर मात करणाऱ्या कोविशिल्डचा एक लाख ३९ हजार ५०० लसीचा पहिला साठा बुधवारी सकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनावर मात करणाऱ्या कोविशिल्डचा एक लाख ३९ हजार ५०० लसीचा पहिला साठा बुधवारी सकाळी साडेपाच वाजता मुंबईत दाखल झाला. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची ही लस महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी विशेष वाहनांद्वारे पोलीस बंदोबस्तात मुंबईत आणली. मात्र, कांजूरमार्ग येथील कोल्ड स्टोअरेज अद्याप तयार नसल्याने परळ येथील एफ दक्षिण विभाग कार्यालयातील साठवणूक केंद्रात लसीचा साठा ठेवण्यात आला आहे. दररोज १४ हजार ४०० लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल.

पाच टप्प्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. १५ लसीकरण केंद्रांपैकी नऊ ठिकाणी ड्राय रन घेण्यात आली. उर्वरित सहा ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी ड्राय रन घेण्यात येईल. मात्र, लसीकरण झाल्यामुळे आपली जबाबदारी संपली नसून यानंतरही नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, हात धुणे या त्रिसूत्रीचे नियमितपणे पालन करणे गरजेचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

* येथे करणार साठवणूक

एक लाख ३९ हजार ५०० लसींचा साठा सध्या २ ते ८ डिग्री सेंटीग्रेड तापमानात ठेवला आहे. येत्या शनिवारी एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईतील लसीकरण केंद्रांवर ही लस पोहोचविण्यात येईल. या केंद्रांमध्ये संपूर्ण लसीकरण मोहिमेची तयारी करण्यात आली आहे. कांजूरमार्ग येथे पाच हजार चौ. फूट जागेमध्ये लसीकरणासाठी शीतगृह केंद्र तयार करण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दहा लाखांपेक्षा जास्त लस आली तर कांजूरमार्गला साठवली जाईल.

* यांना मिळणार लस

एक लाख १९ हजार २६८ आरोग्य सेवकांनी नोंदणी केली आहे. १६ जानेवारीच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना, त्यानंतर तिसऱ्या टप्प्यांमध्ये ५० वर्षांवरील नागरिकांना तसेच जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येईल. चौथ्या टप्प्यात १८ वर्षांवरील मुलांना लस देण्यात येईल. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पालिकेचे केईएम, नायर, शीव, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात लसीकरण करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात दररोज २४ हजार जणांना लस देता येईल.

........................

अशी मिळणार लस...

कोविन ॲपवर आधार कार्डद्वारे नोंदणी करणाऱ्या लाभार्थींना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस येईल.

त्यांना लस मिळण्याचा दिवस, वेळ आणि जागेबाबत कळविण्यात येईल.

पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसऱ्या डोसबाबत कळविण्यात येणार.

दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्राची लिंक पाठविण्यात येणार.

लसीकरण केंद्रावर अशी असेल व्यवस्था

* लाभार्थींच्या नावाची नोंदणी तपासून केंद्रात प्रवेश मिळणार. (१२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य असतील.)

* ओळखपत्र तपासून एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश देण्यात येईल.

* प्रशिक्षित परिचारिका अथवा आरोग्य कर्मचारी संबंधित व्यक्तीला लस देतील.

* डोस घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती ३० मिनिटे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असेल.

* या अर्ध्या तासात कोणताही त्रास न जाणवल्यास त्या व्यक्तीला घरी सोडण्यात येईल.

* घरी जाऊन काही त्रास झाल्यास पालिकेशी किंवा जवळच्या लसीकरण केंद्राला संपर्क करावा.