एक लाख ४० हजार नवमतदार नोंदणी
By admin | Published: September 12, 2014 01:12 AM2014-09-12T01:12:49+5:302014-09-12T01:12:49+5:30
विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मतदार नोंदणी मोहिमेनेही वेग पकडला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मतदार नोंदणी मोहिमेनेही वेग पकडला आहे. अठरा वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांना विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या आवाहनानंतर आजमितीस उपनगरात तब्बल १ लाख ४० हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनच मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ९ ते ३० जून या कालावधीत छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. शिवाय या कालावधीनंतरदेखील निरंतर अद्ययावतीकरणांतर्गत मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर मुंबईच्या उपनगरामध्ये १ लाख ४० हजार नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच घोषित होणार असून, नवीन मतदार नोंदणीकरिता (नमुना-६) अर्ज विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाच्या दहा दिवस आधीपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. परिणामी नव्या मतदारांना नोंदणी करण्यासाठी आता मर्यादित कालावधी शिल्लक राहिला आहे. (प्रतिनिधी)