एक लाख कार्डधारकांनी घेतला रेशन कार्ड पोर्टेबिलिटीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 07:20 AM2020-12-23T07:20:37+5:302020-12-23T07:20:56+5:30
ration card portability : शासनाने रेशन कार्ड पोर्टेबिलिटीचा विकल्प उपलब्ध करून दिल्यानंतर मुंबईत नोव्हेंबर, २०२० पासून अद्याप १ लाख ८५ हजार २२९ जणांनी कार्ड पोर्ट केले.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : एखादा दुकानदार धान्य देत नसेल तर रेशन कार्डधारकांना दुसऱ्या दुकानाचा पर्याय खुला करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यात मुंबई तसेच उपनगरात १ लाख ८५ हजार २२९ कार्डधारकांनी ‘पोर्टेबिलिटी’चा लाभ घेतल्याची माहिती मंगळवारी रेशनिंग नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शासनाने रेशन कार्ड पोर्टेबिलिटीचा विकल्प उपलब्ध करून दिल्यानंतर मुंबईत नोव्हेंबर, २०२० पासून अद्याप
१ लाख ८५ हजार २२९ जणांनी कार्ड पोर्ट केले. त्यांना आता कमी किंमत असलेल्या धान्याच्या दुकानातून ते प्राप्त करणे सोपे झाले आहे. मुंबईत परळ, अंधेरी, वडाळा, ठाणे आणि कांदिवली या रिजनमध्ये १९ लाख ९० हजार ८९० कार्डधारक आहेत. त्यापैकी १ लाख ८५ हजार २२९ कार्ड पोर्ट करण्यात आली आहेत. पत्ता बदलला अथवा कामासाठी इतरत्र राहावे लागत असल्याने ट्रान्स्फर करण्यात आलेल्या कार्ड्सची संख्या २२ डिसेंबर, २०२० पर्यंत १ लाख ९१ हजार २१८ इतकी असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
‘एईपीडीएस’ कार्डधारकांसाठी फायदेशीर
सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकांना रेशन मिळावे हा त्यांचा अधिकार असून त्यांना तो मिळावा यासाठी आम्ही पुरेपूर सहकार्य करीत आहोत. त्यात एईपीडीएस (Aadhaar enabled Public Distribution) सिस्टीम फायदेशीर ठरत असून त्याच्या वापरामुळे अगदी सहजपणे त्यांना धान्य उपलब्ध होत आहे. तसेच या प्रक्रियेदरम्यान अद्याप तरी कोणतीही तक्रार आम्हाला मिळालेली नाही.
- कैलास पगारे,
रेशनिंग नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक