सरकारच्या गलथानपणामुळेच मृतांचा आकडा एक लाख - भाजपचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:07 AM2021-06-09T04:07:11+5:302021-06-09T04:07:11+5:30
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळेच महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या एक लाखापेक्षा अधिक झाली आहे. आघाडी सरकारला कोरोना ...
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळेच महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या एक लाखापेक्षा अधिक झाली आहे. आघाडी सरकारला कोरोना हाताळणीसाठी सक्षम धोरण आखता न आल्याचीच फळे राज्यातील जनता भोगत आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली.
भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये म्हणाले की, महाराष्ट्रातील कोरोना मृतांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतील मृत्यूंची संख्या कितीतरी कमी आहे. आघाडी सरकारला कोरोना प्रसारामुळे उद्भवलेली स्थिती योग्य तऱ्हेने हाताळता न आल्यानेच राज्यातील आकडा एक लाखाच्या पुढे गेला आहे. तर, राज्य सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलनाचे नाटक सुरू केले आहे. राज्य सरकारने इंधनावरील कर दोनदा वाढविले असताना त्याविरोधात काँग्रेसने आवाज उठवला नाही. काँग्रेसला राज्य सरकारमध्ये किंमतच उरलेली नाही. त्यामुळे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलनाचा फार्स केला, असे उपाध्ये म्हणाले.
मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडे लॉकडाऊन शिथील करण्याबाबत ठाम धोरण नसल्याने राज्यात सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. कोणते निर्बंध उठवले, कोणते निर्बंध कायम आहेत, याची स्पष्टता नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर गोंधळ निर्माण झाला आहे. प्रशासनातील गोंधळाचा फटका सामान्य माणसाला बसतो आहे, अशी टीकाही उपाध्ये यांनी केली.