वीस दिवसांत एक लाख कर्मचाऱ्यांचे करणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:07 AM2021-01-22T04:07:01+5:302021-01-22T04:07:01+5:30

पालिका प्रशासनाची माहिती : आतापर्यंत ५,५२१ जणांनी घेतला डाेस लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू ...

One lakh employees will be vaccinated in twenty days | वीस दिवसांत एक लाख कर्मचाऱ्यांचे करणार लसीकरण

वीस दिवसांत एक लाख कर्मचाऱ्यांचे करणार लसीकरण

Next

पालिका प्रशासनाची माहिती : आतापर्यंत ५,५२१ जणांनी घेतला डाेस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले असले तरी त्याची प्रक्रिया काहीशी संथ आहे. त्यात ‘को-विन’च्या तांत्रिक अडचणींमुळे वेग अधिकच मंदावला. तरीही आतापर्यंत मुंबईत ५ हजार ५२१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा डाेस घेतला असून, येत्या वीस दिवसांत एक लाख कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

पालिका प्रशासनाने दिवसाला १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित केले हाेते. परंतु, ‘को-विन’च्या तांत्रिक समस्यांमुळे नोंदणी प्रक्रियेत अडथळा आल्याने ही संख्या गाठणे शक्य झाले नाही. लसीकरण सुरू झाल्यानंतर शहर, उपनगरात तीन दिवसांत केवळ ५ हजार ५२१ लाभार्थ्यांनी लस घेतली. पालिकेच्या वतीने ७५ लसीकरण केंद्रे तयार करण्यात येणार होती. मात्र, ‘को-विन’ ॲपमधील बिघाडामुळे या संख्येत घट करून ती ४८ करण्यात आली.

काही दिवसांत लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. पालिका प्रशासन संपूर्ण आठवडाभर लसीकरणाची प्रक्रिया राबविण्यास सक्षम असल्याचे केंद्र शासनाला कळविले आहे. तरीही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आठवड्यातून केवळ चार दिवसच लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात येईल, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.

* विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

लसीकरणाची गती मागील तीन दिवसांत कोविन ॲपमुळे मंदावली आहे. मात्र त्यातील अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. यापूर्वीच, कोविन ॲपवर एक लाख आराेग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर सामान्यांच्या लसीकरण प्रक्रियेचा विचार केला जाईल. याशिवाय, ॲपमधील समस्येमुळे ज्यांच्या नावे नोंदणीत अडथळा येत असेल अशा आराेग्य कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहनही काकाणी यांनी केले.

---------------------------

Web Title: One lakh employees will be vaccinated in twenty days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.