Join us

पाहुणे म्हणून आले एक लाख फ्लेमिंगो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 9:40 AM

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी भारतभर वन्यजीव संशोधन करत असून, २०१८ पासून संस्थेतर्फे फ्लेमिंगोंच्या संख्येवर लक्ष ठेवण्यात आहे. त्यांचे टॅगिंग करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील दलदलीची ठिकाणे, खाड्या आणि पाणथळ जागी फ्लेमिंगो मोठ्या संख्येने येत असून, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २०२१-२०२२ या वर्षात सर्वाधिक संख्येने फ्लेमिंगोंचे आगमन झाल्याची नोंद बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने घेतली आहे. यावर्षीच्या एप्रिल महिन्यात १ लाख ३३ हजार फ्लेमिंगो आले. मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात हे फ्लेमिंगो आढळले आहेत.

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी भारतभर वन्यजीव संशोधन करत असून, २०१८ पासून संस्थेतर्फे फ्लेमिंगोंच्या संख्येवर लक्ष ठेवण्यात आहे. त्यांचे टॅगिंग करण्यात येत आहे. मॅनग्रोव्ह फाऊंडेशनकडे ही आकडेवारी सादर करण्यात आली. २०१७ पासून बीएनएचएसला दहा वर्षांसाठी मुंबईत स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांचे मापन, मोजणी करणे, मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकचा फ्लेमिंगोंवर आणि ठाणे, शिवडी, न्हावा व परिसरातील पक्षिसृष्टीवर होणारे परिणाम याचा अभ्यास करत आहे. त्यावर आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांचा शोध लावण्यासाठीचा प्रकल्प देण्यात आला आहे. या दीर्घकालीन प्रकल्पाकरिता एमएमआरडीएकडून निधी दिला जात आहे. प्रकल्पाची देखरेख कांदळवन प्रतिष्ठानमार्फत केली जात आहे.

फ्लेमिंगो कुठून येतात?    नोव्हेंबर ते मे या कालावधीत फ्लेमिंगोंचे मुंबईतील पाणथळ जागांवर आगमन होते. गुजरात व इराणमधून प्रामुख्याने अन्नाच्या शोधात ते येतात. पावसाळ्यानंतर पाणथळ ठिकाणी पाणी ओसरू लागते तेव्हा स्थलांतराची सुरुवात होते. गेल्या काही वर्षांमध्ये पाऊस भरपूर झाल्याने त्यांचे आगमन काहीसे लांबले होते.    जगातील सहा प्रजातींपैकी फ्लेमिंगोंच्या दोन प्रजाती भारतात आढळतात. त्यांच्यापैकी सर्वात उंच म्हणजे ग्रेटर फ्लेमिंगो होय. दुसरी प्रजाती म्हणजे आकाराने सर्वात लहान असलेला लेसर फ्लेमिंगो होय. 

फ्लेमिंगोंना गोडे पाणी आणि खाडीच्या जागा आवडतात. मुंबईतील खाड्या आणि पाणथळ जागांमुळे येथे अशा जागा येथे मुबलक आहेत. त्यांना ज्या प्रकारचे अन्न येथे मिळते, त्यामुळे ही परिसंस्था त्यांना अधिक पसंत असावी. शेवाळ व शिंपले हे या पक्ष्यांचे मुख्य अन्न असते.- राहुल खोत, उपसंचालक, बीएनएचएस 

 लेसर फ्लेमिंगो लेसर फ्लेमिंगो तुलनेने आकाराने लहान असतात. त्यांच्या शरीरावर गुलाबी रंग असतो. गडद काळ्या रंगाची चोच असते. डोळे लाल असतात. त्यांची मान उलट्या इंग्लिश जे या अक्षरासारखी असते. मुंबईमध्ये येणारे बहुतेक फ्लेमिंगो लेसर फ्लेमिंगो प्रजातीचे असतात आणि उर्वरित ग्रेटर फ्लेमिंगो असतात.

स्थलांतरित पक्ष्यांचे संरक्षण करण्याचा आणि त्यांच्या पुढील पिढ्यांसाठी त्यांचा अधिवास वाचविण्याचा मानस आहे. रामसर ठिकाणांसाठी आम्ही प्रस्ताव दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंजुरी दिली आहे.- वीरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष