मुंबई - महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांचे कनेक्शनचे अर्ज झटपट निकाली काढण्याचा आदेश दिल्यानंतर कंपनीच्या संपूर्ण यंत्रणेने युद्ध पातळीवर काम करून अवघ्या दहा दिवसात एक लाख चार हजार घरगुती ग्राहकांना वीज कनेक्शन देण्याची विक्रमी कामगिरी केली आहे.
लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर २० जून रोजी राज्यभरातील मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत वीज कनेक्शनसाठी प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. त्यावेळी १,१७,५२२ घरगुती वीज ग्राहकांचे जोडण्यांचे अर्ज प्रलंबित असल्याचे आढळले. चंद्र यांनी या प्रलंबित अर्जांच्या संख्येची गंभीर दखल घेतली व हे अर्ज झटपट निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महावितरणची यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागली व केवळ दहा दिवसात १,०४,३९१ नवीन घरगुती वीज कनेक्शन देण्यात आली.
महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार २० जून रोजी प्रलंबित १,१७,५२२ घरगुती कनेक्शन अर्जांपैकी ८३,८३० घरगुती ग्राहकांना म्हणजेच ७१ टक्के ग्राहकांना दहा दिवसात नवीन वीज कनेक्शन देण्यात आली. या खेरीज राज्यात २० जूननंतर नव्या घरगुती वीज कनेक्शनसाठी ५९,९१८ अर्ज आले व त्यापैकी २०,५६१ ग्राहकांनाही दहा दिवसात कनेक्शन देण्यात आली. अशा रितीने एकूण १,०४,३९१ नवीन घरगुती वीज कनेक्शन दहा दिवसात देण्यात आली.
घरगुती ग्राहकांचे नव्या वीज कनेक्शनसाठीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यामध्ये कल्याण झोनने आघाडी घेतली असून या झोनमध्ये १३,३११ नवी कनेक्शन देण्यात आली. त्या खालोखाल पुणे झोनमध्ये १२,२९६ नवीन कनेक्शन देण्यात आली. तिसऱ्या क्रमांकावर कनेक्शन दिलेल्या ८९१५ अर्जांसह बारामती झोन आहे.