राहुल रनाळकर, मुंबईगुडघे प्रत्यारोपण ही २००५ पर्यंत एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मानली जात होती. जरी १९७०च्या दशकापासून अमेरिकेत गुडघ्यांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत होत्या. मात्र, गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आता एवढी सुलभ झाली आहे, की सध्याच्या घडीला राज्यात वर्षभरात सुमारे एक लाख गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत. धातूचे कृत्रिम सांधे हे या प्रत्यारोपणात बसवतात. सिरॅमिक मटेरियलयचेही सांधे देशात आले असून या सांध्यांची मोबॅलिटी ही आधीच्या कृत्रिम सांध्यांपेक्षा अनेक पटींनी वाढली आहे. २००५ पासून गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांमधील सुलभता अधिक वाढली. सध्या या शस्त्रक्रिया मांडीचे स्नायू न कापतादेखील होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पायांची ताकद अजिबात कमी न होता कमीत कमी त्रासात रुग्णांना पूर्ववत चालणे शक्य होते. कृत्रिम सांध्यांची टेक्नॉलॉजी, प्रत्यारोपणाची पद्धती, कृत्रिम सांध्यांसाठी अचूक माप घेण्याचे तंत्र या तिहेरी पातळीवर गुडघे प्रत्यारोपणाची गुणवत्ता सिद्ध होते. २००५ पूर्वी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेवेळी रुग्णाला किमान २ बाटल्या रक्त दिले जात होते. पण सध्याच्या विकसित तंत्रप्रणालीमुळे अत्यंत कमी त्रासात गुडघे प्रत्यारोपण होत असल्याचे मुंबईतील प्रख्यात गुडघे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. नीलेन शहा यांनी सांगितले. गुडघे प्रत्यारोपणामध्ये सर्जरी करण्याची पद्धत महत्त्वाची आहे. केवळ गुडघे प्रत्यारोपण करणारे सुपर स्पेशॅलिटी सर्जन्स सध्या आपल्याकडे आहेत. त्यांच्याकडील अनुभव हा या शस्त्रक्रियांमधील सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे प्रख्यात गुडघे प्रत्यारोपण तज्ज्ञ आणि केईएमच्या आॅर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप भोसले यांनी सांगितले.
वर्षभरात तब्बल १ लाख गुडघ्यांचे प्रत्यारोपण
By admin | Published: September 23, 2014 2:14 AM