क्लीनअप मार्शलकडून एक लाखाच्या खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:07 AM2021-05-16T04:07:08+5:302021-05-16T04:07:08+5:30
फॅक्टरी मालकाची पोलिसांत धाव, चौघांंना अटक क्लीनअप मार्शलकडून एक लाखाच्या खंडणीची मागणी फॅक्टरी मालकाची पोलिसांत धाव; चौघांंना अटक लोकमत ...
फॅक्टरी मालकाची पोलिसांत धाव, चौघांंना अटक
क्लीनअप मार्शलकडून एक लाखाच्या खंडणीची मागणी
फॅक्टरी मालकाची पोलिसांत धाव; चौघांंना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर थुंकणाऱ्या, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडून कंत्राट पद्धतीने नेमलेल्या कंपनीचे क्लीनअप मार्शल तैनात आहेत. याचाच गैरफायदा घेत एका क्लीनअप मार्शलने नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत, थेट फॅक्टरी मालकाकडे १ लाखाच्या खंडणीची मागणी केली. २० हजार रुपये स्वीकारुन उर्वरित रकमेसाठी धमकाविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंधेरीत परिमंडळ १० च्या पोलिसांनी शनिवारी चौघांना अटक केली.
पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेने कंत्राट पद्धतीने नेमलेल्या विद्यांचल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने कार्यरत असलेल्या अजित सिंह नावाच्या मार्शलने ही मागणी केली होती. २१ एप्रिल रोजी तक्रारदार अनिल जलान यांच्या अंधेरीतील फॅक्टरीवर गेला. तेथे विनामास्क तसेच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा कांगावा करत त्याने एक लाख रुपयांची मागणी केली.
पोलीस कारवाईच्या भीतीने त्यांनी २० हजार रुपये दिले. शुक्रवारी अजित आणि त्याचे चार साथीदार पुन्हा तक्रारदाराच्या कंपनीत आले व पैशांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत धाव घेताच, पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू करण्यात आला. याप्रकरणी प्रमोद माने, विशाल सूर्यवंशी, आकाश गायकवाड, दादासाहेब गोडसे यांना अटक करण्यात आली असून, अजितचा शोध सुरू आहे.