मुंबई : महाराष्टÑ पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गंत पोलीस व त्यांच्या जवळच्या नातेवाईकावर मोफत उपचार व औषधोपचाराची सवलत असताना बॉम्बे हॉस्पिटलने एका कॉन्स्टेबलवर शस्त्रक्रिया करण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचे समोर आले. कॉन्स्टेबलने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यावर आता हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडे विचारणा करण्यात आली आहे.
अशा अनेक तक्रारी आल्याचे उपायुक्त (मुख्यालय-१) एन. अंबिका यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठविलेल्या नोटीशीत नमूद आहे.नायगाव सशस्त्र दलात कार्यरत कॉन्स्टेबल सुनील टिंबे यांचा सहा वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्या वेळी त्यांना पोलिसांना विनामूल्य आरोग्य सुविधा उपलब्ध असलेल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गुडघ्याची वाटी व टाचेवरील हाड मोडल्याने त्यांच्याकडून आॅपरेशनसाठी १ लाख रुपये घेण्यात आले. याबाबत त्यांनी गेल्या वर्षी २५ डिसेंबरला पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती.