ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांसाठी कोरोनाच्या एक लाख तीन हजार लसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:06 AM2021-01-14T04:06:42+5:302021-01-14T04:06:42+5:30
ठाणे : कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतीक्षा संपली असून, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी एक लाख तीन हजार लसी आरोग्य ...
ठाणे : कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतीक्षा संपली असून, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी एक लाख तीन हजार लसी आरोग्य उपसंचालक विभागास बुधवारी पहाटे प्राप्त झाल्या. लवकरच तिन्ही जिल्ह्यांतील लसीकरण केंद्रांवर त्यांचे वितरण करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
तिन्ही जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक ७४ हजार लसी प्राप्त झाल्या असून, जिल्ह्यातील २९ केंद्रांवर त्या वितरित करण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यासाठी १९ हजार ५०० लसींचे सहा केंद्रांवर, तर रायगड जिल्ह्यासाठी ९ हजार ५०० लसींचे पाच केंद्रांवर वितरण केले जाणार आहे.
प्रत्येक महापालिकेसाठी चार ते पाच हजार लसी
उपलब्ध साठ्यातून ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महापालिकेसाठी प्रत्येकी ४ ते ५ हजार लसी देणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी दिली. या लसी कोल्ड चेनच्या माध्यमातून त्या - त्या महापालिकांच्या ठिकाणी रवाना करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या या लसींचा साठा ठाण्यातील मनोरुग्णालयाच्या बाजूला असलेल्या उपसंचालक कार्यालय, मुंबई मंडळ, ठाणे येथे करण्यात आला आहे.
कोरोना लसीचे महापालिकानिहाय वितरण
महापालिका लसींची संख्या केंद्रे
ठाणे ग्रामीण ११,५०० ०७
कल्याण-डोंबिवली ६,००० ०४
उल्हासनगर ५,००० ०१
भिवंडी ३,५०० ०४
ठाणे १९,००० ०४
मीरा-भाईंदर ८,००० ०४
नवी मुंबई २१,००० ०५
ठाणे महानगरपालिकेस जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी एकूण १९ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. १६ जानेवारी रोजी रोझा गार्डनिया, कोरस, कळवा आणि कौसा आरोग्य केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. या दिवशी एकूण ४०० लोकांना लस देण्यात येणार आहे.
- संदीप माळवी,
उपायुक्त, ठाणे महापालिका