महिला बचत गटांना एक लाख; गरीब, गरजू महिलांना अर्थसाह्य देत पालिका करणार सक्षम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 10:56 AM2024-02-06T10:56:56+5:302024-02-06T10:58:47+5:30

यंदा पालिकेच्या अर्थसंकल्पात विकास नियोजनासाठी ८०० कोटींची तरतूद केलेली आहे.

one lakh to women self help groups municipality will be able to provide financial assistance to poor and needy women | महिला बचत गटांना एक लाख; गरीब, गरजू महिलांना अर्थसाह्य देत पालिका करणार सक्षम

महिला बचत गटांना एक लाख; गरीब, गरजू महिलांना अर्थसाह्य देत पालिका करणार सक्षम

मुंबई : पालिकेच्या नियोजन विभागामार्फत समाजातील गरजू आणि अल्प उत्पन्न असलेल्या घटकांना सक्षमीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात. यामध्ये गरजू महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय यांच्या सामाजिक कल्याणासाठी पालिका वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असते. यंदा पालिकेच्या अर्थसंकल्पात विकास नियोजनासाठी ८०० कोटींची तरतूद केलेली आहे. त्यामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांना या योजनांच्या माध्यमातून बळ मिळणार असून, त्यांचाही विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत २००९ पासून महिला बचत गटांची स्थापना करण्यात येत आहे. महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने महिलांना केंद्रबिंदू मानून विविध योजनांच्या माध्यमातून गरीब व गरजू महिलांना एकत्रित करून योजनेचा लाभ देण्यात येत आहे. महिला बचत गटांचे आणखी सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटाला प्रत्येकी एका लाख याप्रमाणे थेट आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचावणे शक्य व्हावे, विकासकामात त्यांचा सक्रिय सहभाग असावा, यासाठी जेंडर बजेट अंतर्गत निरनिराळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. जेंडर आरक्षणांतर्गत आधार केंद्रासाठी ही जवळपास १३ कोटींची तरतूद आहे.

घरघंटी, शिवणयंत्र, कांडप यंत्र देणार :

 महिलांच्या स्वयंरोजगारासाठी यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी पालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. 

 पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवण यंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारच्या अर्थसहाय्यासाठी १०० कोटींहून अधिकची तरतूद पालिकेकडून करण्यात आली आहे.

 महिलांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी पालिकेने यंदा नवीन योजना आणल्या आहेत. पालिकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करण्यात येणार असून तिथे त्यांच्या मनोरंजनासाठी सुविधा उपलब्ध असणार आहेत. 

 दिव्यांगांना मदतीचा हात देण्यासाठी रोजगारभिमुख प्रशिक्षण, बसभाड्यात सवलत, स्कूटर अशा सवलतींसह यंदा अर्थसहाय्य योजनाही सुरू करण्यात आली आहे.

Web Title: one lakh to women self help groups municipality will be able to provide financial assistance to poor and needy women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.