एक लाख लसधारक आजपासून करणार लोकल प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:06 AM2021-08-15T04:06:32+5:302021-08-15T04:06:32+5:30
मुंबई : राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे. त्यानुसार मुंबई महानगर ...
मुंबई : राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील लसधारकांना रविवार, १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे. महानगर क्षेत्रातील महापालिकांनी कोरोना लसीकरणाची पडताळणी केल्यानंतर मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स-हार्बरवरील तब्बल १ लाख १२ हजार २३८ लसधारकांनी मासिक पास घेतला आहे. या सर्व प्रवाशांना स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर स्वस्त आणि वेगवान लोकल प्रवास करता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून लोकल बंद आहे. ही लोकल सेवा मर्यादित घटकांसाठी सुरू आहे. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळाला होता. त्यामुळे सातत्याने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत होती.
लसधारकांनी रेल्वेस्थानकांवरील स्थानिक महापालिकेच्या पडताळणी केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने पडताळणी ११ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली. या पद्धतीने शनिवार सायंकाळी सातपर्यंत ७७,०९८ लसधारकांनी पास काढले. पश्चिम रेल्वेवरील (सहापर्यंत) लसधारक पास घेण्याऱ्यांची संख्या ३५,१४० इतकी आहे. वातानुकूलित लोकलसाठी १०४ लसधारकांनी विशेष पास विकत घेतले.
मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकात आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकात सर्वाधिक पासची विक्री झाल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.