- जयंत होवाळ मुंबई - कोस्टल रोडच्या वरळी ते मरिन ड्राइव्ह या एका मार्गिकेचे लोकार्पण नऊ मार्च रोजी होण्याची दाट शक्यता आहे. या दिवशी लोकार्पण करण्याची तयारी पालिका प्रशासनाने आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होईल की पंतप्रधानांच्या हस्ते व्हर्च्युअल माध्यमातून लोकार्पण याविषयी अजून पालिका स्तरावर अनिश्चितता आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केल्यानंतर कोस्टल रोडची मार्गिका सुरु होईल, असे संकेत मिळाले आहेत. याच महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने लोकार्पण कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास करताना त्यांनी प्रगतिपथावर असलेल्या कामांचा आढावा घेतला. कोस्टल रोडचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. कोस्टल रोडच्या रस्त्यालगत ३२० एकर जागेत भव्य सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. २०० एकर जागेत वेगवेगळी झाडे लावण्यात येणार आहेत. हे पार्क जागतिक दर्जाला साजेसे असेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
कोस्टल रोडच्या पाहणीनंतर त्यांनी वरळी मधील गणपतराव कदम मार्ग, सेठ मोतीलाल सांघी मार्ग आणि त्यानंतर दादर येथील दादासाहेब रेगे मार्ग या तीन ठिकाणी रस्ते काँक्रिटीकरण कामांची पाहणी केली. रस्ते काँक्रिटीकरणामुळे रस्ते खड्डे मुक्त होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. पावसाळ्यातील पाणी शोष खड्ड्यांद्वारे जमिनीत मुरवण्यासाठी या काँक्रिटीकरण कामांमध्ये ठराविक अंतरावर रस्त्यांच्या कडेला शोष खड्ड्यांचा देखील समावेश केला असल्याने ही कामे पर्यावरणपूरक आहे. तसेच उपयोगिता वाहिन्यांचा (डक्ट) देखील समावेश करण्यात आल्याने वेगवेगळ्या सेवा वाहिन्या त्यातून टाकण्यात येतील, परिणामी रस्ते वारंवार खोदले जाणार नाहीत आणि रस्त्यांचे आयुर्मान व गुणवत्ता वाढेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणात कोस्टल रोडच्या तीन मार्गिकेची एक बाजू सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वरळीहून मरीन ड्राइव्ह येथे जाता येणार आहे. हा मार्ग सकाळी ८ ते रात्री ८ असे बारा तास सुरू राहणार आहे. उरलेल्या वेळेत कोस्टल रोडचा उत्तरेकडील मार्ग पूर्ण करण्याचे काम आणि या मार्गाला वरळी-वांद्रे आणि शिवडी सागरी सेतू जोडण्याचे काम करण्यात येणार आहे.
कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे लोकार्पण फेब्रुवारी महिन्यात होईल असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र हा मुहूर्त काही साधता आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच विविध प्रकल्पांसाठी नवी मुंबईत आले होते. त्या निमित्ताने त्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या कार्यक्रमाचा बार उडेल अशी जोरदार चर्चा होती. मात्र कोस्टल रोडच्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले नसल्याने पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन करता आले नाही. आता पंतप्रधान मुंबईत येण्याची शक्यता नाही. त्यामुळे बहुधा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल अशी शक्यता आहे. अथवा पंतप्रधान व्हर्च्युअल माध्यमातून उदघाटन करू शकतात, अशी दुसरी शक्यता आहे. मात्र या दोन्हीपैकी नेमके काय होणार आहे, याविषयी गुरुवारी तरी पालिका स्तरावर स्पष्टता नव्हती.