रखडलेल्या लोअर परळ उड्डाणपुलाची एक मार्गिका १८ सप्टेंबरला खुली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:26 PM2023-09-14T13:26:33+5:302023-09-14T13:27:06+5:30
लोअर परळ उड्डाणपुलाची (डिलाइल रोड पूल) एक मार्गिका १ जूनपासून खुली केल्यानंतर पुलाचे काम जुलैअखेरीस पूर्ण करून रहदारीसाठी खुला केला जाणार होता.
मुंबई :
लोअर परळ उड्डाणपुलाची (डिलाइल रोड पूल) एक मार्गिका १ जूनपासून खुली केल्यानंतर पुलाचे काम जुलैअखेरीस पूर्ण करून रहदारीसाठी खुला केला जाणार होता. मात्र, तांत्रिक अडचणी आणि पावसाने काम पूर्ण होण्याची अंतिम मुदत पुढे ढकलण्यात आली. आता येत्या १८ सप्टेंबरपर्यंत पुलाची आणखी एक मार्गिका सुरू करून नोव्हेंबर मध्यापर्यंत पुलाचे उर्वरित काम पूर्ण करून उड्डाणपुलाचा उर्वरित भागही खुला केला जाईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक झाल्याने २४ जुलै २०१८ पासून वाहन आणि पादचाऱ्यांसाठी बंद केला. पुलाचे काम मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वे करत आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये रेल्वे हद्दीवरील या पुलाचा भाग तोडण्याच्या कामाला सुरुवात केली. या पुलावर पहिला गर्डर बसवण्याचे काम जून २०२२ मध्ये पूर्ण करण्यात आले, तर दुसरा गर्डर २४ सप्टेंबर २०२२ मध्ये बसवण्यात आला. मात्र, हे काम काही ना काही कारणास्तव रखडले. त्यामुळे गर्डर बसवूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेला नाही.
गेल्या पाच वर्षांपासून हा पूल रखडलेला
या पुलाची पश्चिमेकडील मार्गिका १ जूनपासून वाहनचालकांसाठी खुली झाली. त्यामुळे गेल्या किमान पाच वर्षांपासून रखडलेल्या या पुलाचा एक टप्पा पूर्ण झाला. मात्र, पूर्वेकडील बाजू अद्याप सुरू न झाल्यामुळे संपूर्ण पुलाचा अद्यापही वापर करता येत नाही. संपूर्ण पूल सुरू होण्यास पालिका प्रशासनाने आधी जुलैअखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत हुकल्यानंतर हा पूल नोव्हेंबरमध्ये पूर्ण क्षमतेने खुला करण्यात येईल अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात येत आहे.
गणेशोत्सव काळात भाविकांची कोंडी नको
गणेशोत्सवाच्या काळात लोअर परेल, करीरोड, लालबाग या परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हा पूल सुरू करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. पूल विभागाने तशी तयारी सुरू केली होती. मात्र, नंतर ही मुदतसुद्धा ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. मात्र, आता करीरोडकडे जाणारी बाजू गणेशोत्सवाआधी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.