पश्चिम रेल्वे मार्गावर १० लाख तर मध्य रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ६४ हजार प्रवाशांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 08:46 PM2020-07-03T20:46:19+5:302020-07-03T20:47:35+5:30
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरून १५ जूनपासून ३६२ लोकल फेऱ्या धावण्यास सुरूवात झाली. यामधून कल्याण-डोंबिवली, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पालघर, मीरा भाईंदर, वसई-विरार महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, बेस्ट कर्मचारी, मंत्रालय कर्मचारी, सरकारी आणि खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.
मुंबई - मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने १५ जूनपासून निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रवास वेळेत होण्यास मदत झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मागील १८ दिवसात सुमारे १० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर, मध्य रेल्वे मार्गावर दररोज ६३ ते ६४ हजार प्रवाशांचा प्रवास होत आहे.
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरून १५ जूनपासून ३६२ लोकल फेऱ्या धावण्यास सुरूवात झाली. यामधून कल्याण-डोंबिवली, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पालघर, मीरा भाईंदर, वसई-विरार महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, बेस्ट कर्मचारी, मंत्रालय कर्मचारी, सरकारी आणि खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. तर, १ जुलैपासून आयकर विभाग, बँक कर्मचारी, वीज कंपन्या, न्यायालयातील कर्मचारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कर्मचारी, स्टॉक एक्सेंज कर्मचारी, राज भवन, जीएसटी आणि कस्टम कर्मचारी, सुरक्षा विभाग या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तिन्ही रेल्वे मार्गावर आता एकूण ७०० फेऱ्या धावत आहेत.
मध्य रेल्वे मार्गवरून दररोज सुमारे ६३ ते ६४ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर सुमारे ५५ ते ५६ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. मागील १८ दिवसात मध्य रेल्वेला अत्यावश्यक लोकल सेवा चालवून २ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर, पश्चिम रेल्वेला १ कोटी ८ लाख रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.