Join us  

महाराष्ट्रात १० लाख विद्यार्थी फुटबॉल खेळतील, ‘मिशन वन मिलियन’ मोहिमेची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:10 AM

आॅक्टोबर महिन्यात होत असलेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान भारत सज्ज असून, या स्पर्धेनिमित्त ८ सप्टेंबरला महाराष्ट्रात सुमारे १० लाख शालेय विद्यार्थी फुटबॉल खेळतील.

मुंबई : आॅक्टोबर महिन्यात होत असलेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान भारत सज्ज असून, या स्पर्धेनिमित्त ८ सप्टेंबरला महाराष्ट्रात सुमारे १० लाख शालेय विद्यार्थी फुटबॉल खेळतील. या वेळी ऐतिहासिक मोहीम साकारण्यात येईल, असा विश्वास राज्य क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ फुटबॉल क्रांती निर्माण करण्यात येणार आहे. याबाबत तावडे यांनी शुक्रवारी मंत्रालयामध्ये माहिती दिली. या वेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) उपाध्यक्ष विश्वजीत कदम, विफाचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजी राजे भोसले यांचीही उपस्थिती होती.तावडे यांनी या वेळी म्हटले की, ‘मोहीम ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ अंतर्गत राज्यातील ३० हजारांहून अधिक शाळांमध्ये सुमारे १ लाख फुटबॉलचे वाटप करण्यात आले आहे, तसेच शालेय-महाविद्यालयीन स्तरीय, विद्यापीठस्तरीय विशेष फुटबॉल स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.’त्याचप्रमाणे, ‘१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर सध्या ‘मिशन इलेव्हन मिलियन’ प्रकल्प सुरू झालेला असून, याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘मिशन वन मिलियन’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत सुमारे १० लाखांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत फुटबॉल आणि क्रीडा संस्कृती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.’