सोलापूर : आमच्या डोळ्यांसमोर साक्षात मृत्यू दिसत होता. बचावासाठी जवळपास कुणीच नव्हते. बोटीत भराभर पाणी भरत असल्याने बोट बुडण्याच्या स्थितीत असताना अचानक एक बोट धावून आली आणि आम्ही बचावलो. बोटीला येण्यास एक मिनिटाचा जरी उशीर झाला असता तरी अनर्थ घडला असता, असे शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी सांगितले.तानाजीराव शिंदे हे आमदार विनायक मेटे यांचे सहकारी म्हणून ओळखले जातात. बुधवारी शिवस्मारकाकडे जाताना झालेल्या दुर्घटनेत ते बचावले. याबाबत ते म्हणाले, हा अपघात बोट चालकाच्या हेकेखोरपणामुळे घडला. बोटीत पाठीमागे बसलेल्या चालकाच्या सहकाऱ्याने दुसºया बाजूने बोट वळवण्याचा सल्ला दिला, परंतु त्याने तो ऐकला नाही. स्पीड बोट खडकावर जाऊन आदळली आणि तिला छिद्र पडले, त्यातून भराभर पाणी बोटीत येत होते. आमच्यापैकी काही जण फोनवरून दुर्घटनेची माहिती देत होते. जवळपास एकही बोट नव्हती, माणसं नव्हती, अशा वेळेस अचानक एक बोट धावून आली. त्यातील माणसांनी आम्हा सर्वांना भराभर ओढून घेतले. त्यांनी एक मिनिट जरी उशीर केला असता तरी होत्याचे नव्हते झाले असते.बोटीचा प्रवास सुरू झाल्यानंतर पंधरा मिनिटांत लाइट हाउसजवळ बोट खडकावर आदळली. पाणी शिरून बोट बुडू लागली. चालकाने सुरक्षा जॅकेट घालायला सांगितले. काही जण फोन लावत होते. काही जण जॅकेट घालत होते. मृत सिद्धेश पवारसह काही जण बोटीतील पाणी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा ही बोट धावून आली, म्हणून आम्ही वाचलो. पण पाणी काढण्याच्या प्रयत्नात असलेला सिद्धेश शेवटी राहिला, त्याला काढता आले नाही, तो बुडाला, असेही शिंदे यांनी सांगितले.>अपघात की घातपात?लातूर : दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी शिवस्मारकाचे जलपूजन केले. मात्र कामाला सुरुवात झाली नाही. निवडणुका जवळ आल्या म्हणून सुरु केलेली उभारणी आणि तिथे झालेला अपघात हा अपघात आहे की घातपात? अशी शंका निर्माण झाल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी येथे सांगितले.
‘एक मिनिटाचा उशीर जीवावर बेतला असता’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 5:39 AM