Join us

एक चूक अन् खेळ खल्लास..! सुईचा चुकीचा वापर केल्याने ५०० हून अधिक जणांना एड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 7:16 AM

रक्त घेण्याची वेळ आली तर एचआयव्हीमुक्त रक्त व रक्तघटकांचा वापर करावा. इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरिंज आणि सुईचा वापर करावा

स्नेहा मोरेमुंबई - सहसा इंजेक्शनला सर्वच जण घाबरतात, परंतु अगदीच गरज असेल तरच डॉक्टर इंजेक्शन घेण्याचा सल्ला देतात. मात्र, याच इंजेक्शनमुळे गेल्या सहा वर्षांत तब्बल ५३९ जणांना एडस्ची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंजेक्शनला लावलेली सुई आणि सिरिंज हे या घातास कारणीभूत ठरले आहेत. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यातही २०२२-२३ या वर्षात सर्वाधिक २६१ जणांना एड्सची बाधा झाली. 

या कारणांमुळे एड्स पसरत नाही  

एचआयव्हीबाधित व्यक्तीला स्पर्श केल्यानेत्या व्यक्तीशी हस्तांदोलन केल्यानेगळाभेट घेतल्याने किंवा एड्सबाधित व्यक्तीला चावलेला डास अबाधित व्यक्तीला चावला तरी एड्स होत नाही.बाधित व्यक्तीसोबत जेवण केल्यास किंवा त्या व्यक्तीची भांडी वापरल्याने तसेच कपडे वापरल्याने किंवा एकाच स्नानगृहात किंवा शौचालयाचा वापर केल्यानेही एड्स होत नाही.

रक्त घेण्याची वेळ आली तर एचआयव्हीमुक्त रक्त व रक्तघटकांचा वापर करावा. इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरिंज आणि सुईचा वापर करावा, गुप्तरोग झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. बरेच रुग्ण एड्स झाल्याचे निदान होताच तो लपवून ठेवतात. हे योग्य नाही. त्याने घरातील सदस्यांना याबाबत माहिती द्यावी व उपाययोजना व उपचार करण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे. - डॉ. नीरज कुमार, रक्तविकारतज्ज्ञ 

HIV ची बाधा होण्याची कारणे

एचआयव्हीचा प्रसार होण्यामागे असुरक्षित लैंगिक संबंध मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. गेल्या वर्षी आढळलेल्या रुग्णांमध्ये सुमारे ९५ टक्के रुग्णांना असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एचआयव्हीची बाधा झाली. देशभरात हे प्रमाण सुमारे ८६.२ टक्के आहे. २.४ टक्के रुग्णांमध्ये आईमार्फत बालकाला, ०.०५ टक्के जणांमध्ये बाधित रक्तामुळे तर ०.२ टक्के रुग्णांमध्ये बाधित सुई किंवा अन्य वैद्यकीय उपकरणांच्या वापरामुळे एचआयव्हीची बाधा झाली. 

२,२६,५४४ एड्सग्रस्त उपचाराधीन तर २,२६,२८७ रुग्ण अँटी रिट्रायव्हल थेरपी घेत आहेत. इंजेक्शन टोचल्यानंतर रक्त येते. सुई आणि सिरिंजचा रक्ताशी संपर्क येतो. एडस्ग्रस्तांच्या शरीरातील रक्तात एचआयव्हीचे विषाणू मोठ्या प्रमाणावर असतात. अशा संक्रमित व्यक्तीसाठी वापरलेले इंजेक्शन पुन्हा वापरले, तर साहजिकच एचआयव्हीचे विषाणू दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे अशा सुई किंवा सिरिंजच्या पुनर्वापरामुळे दुसऱ्या व्यक्तीला एचआयव्ही किंवा रक्ताशी संबंधित इतर आजारांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. तसेच अन्य वैद्यकीय उपकरणे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय वापरल्यानेही एचआयव्हीच्या प्रसाराचा धोका संभवतो. 

टॅग्स :एड्स