लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुढील वर्षाच्या हज यात्रेसाठी हज कमिटी ऑफ इंडियामार्फत जाणाऱ्या यात्रेकरूंना अर्ज करण्यासाठी महिन्याभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. १० जानेवारीपर्यंत त्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
हज कमिटी ऑफ इंडियाच्या मुंबईतील मुख्यालयात गुरुवारी केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या उपस्थितीत २०२१ मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठीची नियमावली निश्चित करण्यात आली. यावेळी त्यांनी अर्जासाठी मुदतवाढ करण्यात आल्याचे जाहीर केले.
कोरोनामुळे पुढच्या वर्षी जून-जुलैमध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे बदल करण्यात आले असून मार्गदर्शक सूचनांची पूर्तता करणाऱ्यांना हजसाठी परवानगी देण्यात आली असून, त्याप्रमाणे भारताने सर्व बाबींची परिपूर्णता केली आहे. त्याबाबतची सर्व माहिती कमिटीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. हजसाठी अर्ज भरण्यासाठी मोबाइलवर विशेष ॲप बनविण्यात आला आहे. ते ऑनलाइन व ऑफलाइनही भरता येतील,
------------
प्रवासाच्या ७२ तासांपूर्वी होणार कोरोनाची तपासणी
हजसाठी नियुक्त झालेल्या प्रत्येक प्रवाशाची यात्रेला निघण्याच्या ७२ तासांपूर्वी कोरोना चाचणी केली जाईल. निगेटिव्ह अहवाल येणाऱ्यांनाच पाठविले जाईल.
-------
मुंबईतून जाणाऱ्यांसाठी ३.३० लाख खर्च
पुढच्या वर्षाच्या हज यात्रेसाठी येणारा खर्च तात्पुरता स्वरूपात निश्चित करण्यात आला आहे. राज्यातून केवळ मुंबईतून यात्रेकरूंना पाठवले जाणार आहे. त्यासाठी एका व्यक्तीला सरासरी ३.३० लाख खर्च येणार आहे.