एक महिन्याने तेजश्रीला व्हेंटिलेटरवरून काढले, लोकलमधून पडून झाली होती जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 02:17 AM2018-05-29T02:17:07+5:302018-05-29T02:17:07+5:30
सव्वा महिन्यापूर्वी सायन आणि माटुंगा स्थानकांदरम्यान ट्रेनमधून पडून जखमी झालेल्या तेजश्री वैद्य हिला एका महिन्यानंतर व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. सध्या तेजश्री स्वत: श्वास घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
मुंबई : सव्वा महिन्यापूर्वी सायन आणि माटुंगा स्थानकांदरम्यान ट्रेनमधून पडून जखमी झालेल्या तेजश्री वैद्य हिला एका महिन्यानंतर व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. सध्या तेजश्री स्वत: श्वास घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शीव रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
तेजश्रीच्या आतापर्यंतच्या उपचारांवर ८० हजार रुपये खर्च झाले आहेत. तर दिवसाला गोळ्यांचा खर्च कमीतकमी १२०० रुपये येतो, असे तिचे वडील श्रीराम वैद्य यांनी सांगितले. तेजश्रीला थोडीफार मदत करण्यासाठी अनेकांनी फोन केल्याचेही तिच्या वडिलांनी सांगितले. पण या सर्व प्रकरणात रेल्वेने एकदाही विचारपूस केली नसल्याची खंत तिच्या वडिलांनी व्यक्त केली.
२३ वर्षांच्या तेजश्रीने एका महिन्यानंतर डोळे उघडले. तिचा उजवा डोळा पूर्णपणे उघडला आहे. तर, डाव्या बाजूच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठी झाल्या असल्याने ती डावा डोळा पूर्ण उघडू शकत नाहीे. तसेच २ दिवसांपासून तिने हाताची बोटे हलवायलाही सुरुवात केली आहे.
आतापर्यंत तेजश्रीवर एकही शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. तिला देण्यात येणाऱ्या औषधांमुळे तिच्या गाठी विरघळू शकतील, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
याविषयी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितले की, तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. हळूहळू ती बरी होईल, असे सांगण्यात
आले.