पुणे : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी सायबर क्राईम सेलने मुंबई येथून एका म्युझिक टिचरला अटक केली आहे. अँथोनी ऑगस्टीन (वय ४०, रा. जोगेश्वरी, मुंबई) असे त्याचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. जाधव यांनी त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. कॉसमॉस बँक सायबर दरोडा प्रकरणात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेने ७ जणांना अटक केली आहे. अंथोनी ऑगस्टीन हा एका खासगी ठिकाणी म्युझिक टिचर म्हणून काम करतो. त्याला पैशाचे आमिष दाखवून कोल्हापूरला नेण्यात आले होते. तेथे त्याला क्लोन केलेली कार्डे देऊन इतरांप्रमाणे त्याच्याकडूनही एटीएममधून पैसे काढून घेण्यात आले. ११ ते १३ ऑगस्ट या कालावधीत कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करण्यात आले होते. या हल्ल्याच्या काळामध्ये तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटण्यात आले होते. त्यापैकी रुपे कार्डचा वापर करुन भारतातून अडीच कोटी रुपये लुटले होते. त्यापैकी कोल्हापूर येथून ९५ क्लोन कार्डांच्या सहाय्याने ८९ लाख रुपये काढण्यात आले असून हे पैसे काढणाऱ्या ७ जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. त्यांना ही कार्ड पुरविणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी यापूर्वी फहिम मेहफूज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्पलेक्स, भिवंडी), फहिम अझीम खान (वय ३०, रा. संभाजीनगर), शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय २८, रा. संभाजीनगर), महेश साहेबराव राठोड (वय २२, रा. धावरीतांडा, नांदेड), नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, रा. विरार, मुळ रा. कुलीना टुकुरा, जि. बरगर, राज्य. ओरीसा), मोहम्मद सईद ईक्बाल हूसेन जाफरी उर्फ अली (वय ३०, रा. हमालवाडा, भिवंडी) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणात आणखी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 11:45 PM