मुंबई - अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. किसन दत्तू नरावडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नरावडे हे 65 वर्षांचे होते. 17 डिसेंबरला कामगार रुग्णालयात भीषण अग्नितांडव घडले. या दुर्घटनेत जवळपास 146 जण जखमी झाले होते. याच दुर्घटनेतील जखमी किसन नरावडे यांचा गुरुवारी (20 डिसेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंधेरी पूर्वेकडे असणाऱ्या कामगार हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. पाहता पाहता या आगीनं रौद्ररुप धारण केले.
आग दुर्घटनेप्रकरणी दोन जणांना अटक
दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना बुधवारी (20 डिसेंबर) बेड्या ठोकल्या आहेत. प्राथमिक तपासात या दोघांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे. सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीचा अभियंता नीलेश मेहता आणि सहायक अभियंता नितीन कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.
('अंधेरी कामगार हॉस्पिटल आग दुर्घटना म्हणजे सरकारच्या निष्काळजीपणाचा कळस')
इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच रुग्णांना इमारतीमध्ये प्रवेश का दिला होता?, याबाबत त्या दोघांकडे चौकशी सुरू आहे. दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ10चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.