...तर आणखी एक जीव गेला असता

By admin | Published: December 18, 2015 02:15 AM2015-12-18T02:15:53+5:302015-12-18T02:15:53+5:30

एअर इंडियाचे कर्मचारी रवी सुब्रह्मण्यम विमानाच्या पंख्याकडे खेचले जात असताना त्यांच्यासोबत असलेल्या हेल्परने प्रसंगावधान राखून स्वत:चा जीव वाचवल्याची माहिती समोर

... one more life would have gone | ...तर आणखी एक जीव गेला असता

...तर आणखी एक जीव गेला असता

Next

मुंबई : एअर इंडियाचे कर्मचारी रवी सुब्रह्मण्यम विमानाच्या पंख्याकडे खेचले जात असताना त्यांच्यासोबत असलेल्या हेल्परने प्रसंगावधान राखून स्वत:चा जीव वाचवल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनीच या घटनेची माहिती त्वरित पायलट व संबंधित विमानतळ प्रशासनाला दिली. अन्यथा सुब्रह्मण्यम यांच्यासोबतच आणखी एका कर्मचाऱ्याचा नाहक जीव गेला असता. या प्रकाराची सखोल चौकशी सुरू झाली आहे. तरीदेखील प्रथमदर्शनी पायलटच्या चुकीमुळे घटना घडल्याचे समोर येत आहे. आदेश येण्यापूर्वीच विमानाचे इंजिन पायलटकडून सुरू करण्यात आले आणि हा विचित्र अपघात घडल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
मुंबई विमानतळावरून एआय-६१९ मुंबई ते हैदराबाद विमान उड्डाणासाठी सज्ज होत होते. त्यासाठी सर्व तांत्रिक सोपस्कार पार पाडले जात होते. ७ वाजता उड्डाण अपेक्षित असलेल्या या विमानाला आधीच उशीर झाला होता. त्यानंतर उड्डाणासाठी रात्री साडेआठची वेळ निश्चित झाली. तेव्हा विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिन आणि पंख्याजवळ अधीक्षक सर्व्हिस इंजिनीअर असलेले रवी सुब्रह्मण्यम कार्यरत होते.
दुपारी २ वाजता ड्युटीवर आलेले सुब्रह्मण्यम यांची ड्युटी रात्री १० वाजता संपणार होती. विमानाच्या चाकाच्या टोकाजवळ (नोज व्हील) असलेली पिन काढून विमान उड्डाणासाठी सज्ज होत होते. ही पिन काढल्यानंतर १५ फूट लांब गेल्यावर विमान उड्डाणासाठी तयार असल्याची माहिती सर्व्हिस इंजिनीअरकडून पायलटला दिली जाते. मात्र सूचना देण्यापूर्वीच विमानाचे इंजिन सुरू झाले. विमान सुरू होताच पंखाही पूर्ण क्षमतेने फिरू लागला. विमान मागे घेताच पंख्यासमोर आलेले सुब्रह्मण्यम आत खेचले गेले.
सुब्रह्मण्यम यांच्या मागेच हेल्पर असलेले शिंदे होते. सुब्रह्मण्यम पंख्यात खेचले जाताच प्रसंगावधान राखून शिंदे यांनी स्वत:ला जमिनीवर झोकून दिले, आणि त्यांचे प्राण वाचले. क्षणाचाही विलंब झाला असता तर त्यांनाही अशाच पद्धतीने जीव गमवावा लागला असता. हा अपघात एवढा भयंकर होता की, त्यात सुब्रह्मण्यम यांचे संपूर्ण शरीर छिन्नविछिन्न झाले. या घटनेची डीजीसीएकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आदेशाआधीच विमान सुरू
अधीक्षक सर्व्हिस इंजिनीअरकडून विमान उड्डाणासाठी सज्ज असल्याचे सांगताच सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडूनही हिरवा कंदील मिळतो. मात्र हे आदेश येण्याअगोदरच पायलटकडून इंजिन सुरू करण्यात आले, आणि हा भयंकर अपघात झाल्याचे विमानतळ प्राधिकरणातील सूत्रांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर पायलट आणि को-पायलटला निलंबित करण्यात आले आहे.
मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर अनेक बाबी
स्पष्ट होतील, असेही सांगण्यात
आले. (प्रतिनिधी)

कुटुंबातील सदस्यालाही नोकरीची ग्वाही
एअर इंडियाकडून रवी सुब्रह्मण्यमच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरीची संधी दिली जाईल, असे एअर इंडिया प्रशासनाने जाहीर केले. एअर इंडियाच्या सीएमडी अश्विनी लोहानी यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषी आढळलेल्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले.

शोकाकु ल वातावरणात अंत्यसंस्कार : सुब्रह्मण्यम यांचे शव गुरुवारी दुपारी त्यांच्या सानपाडा येथील मिलेनियम टॉवरमधील राहत्या घरी आणले. या ठिकाणी ते पत्नी सुजाता व मुलगा कृष्णा यांच्यासोबत राहायचे. मागील १० वर्षांपासून रवी सुब्रह्मण्यम हे त्या ठिकाणी सहकुटुंब राहत होते. यादरम्यान त्यांनी परिसरातील सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासल्याची भावना त्यांच्या परिचित तसेच स्थानिक नगरसेविका ऋचा पाटील यांनी व्यक्त केली.

‘ब्लॅक बॉक्स’ तपासणार : अपघाताचे कारण विमानातील ब्लॅक बॉक्समधूनही समोर येण्याची शक्यता आहे. पायलटकडून विमानाचे इंजिन आदेश मिळण्याआधीच सुरू झाले की नंतर? ही अचूक माहिती ब्लॅक बॉक्समधून समोर येणार आहे. पायलट, सहकारी पायलट यांच्यातील संवादही ‘ब्लॅक बॉक्स’मधून समोर येतील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: ... one more life would have gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.