दोनपैकी एक मूल शारीरिकदृष्ट्या अनफिट; देशातील विद्यार्थ्यांचा फिटनेस अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:59 AM2020-02-07T04:59:20+5:302020-02-07T04:59:51+5:30
७ ते १७ वर्षे वयोगटांतील मुलांची तपासणी
मुंबई : देशातील दोनपैकी एक मूल शारीरिदृष्ट्या तंदुरुस्त नसल्याचे एका सर्वेक्षणात उघडकीस आले आहे. देशभरातील २५० शहरे आणि नगरांमधील ३६४ शाळांमधील ७ ते १७ वर्षे या वयोगटांतील १,४९,८३३ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात प्रत्येक दोनपैकी एका मुलाचा बीएमआय चांगला नसल्याचे आढळून आले आहे.
शाळांमधील मुलांची आरोग्य आणि तंदुरुस्ती जाणून घेण्यासाठी दहा वर्षांपासून स्पोर्ट्स व्हिलेजच्या वतीने वार्षिक आरोग्य सर्वेक्षण (अॅन्युअल हेल्थ सर्व्हे-एएचएस) करण्यात येते. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), एरोबिक क्षमता, उंदराचे स्नायू आणि क्षमता, लवचिकता अशा विविध मापदंडांवर मुलांमधील फिटनेस तपासला जातो. अहवालानुसार एरोबिक क्षमता असणाऱ्या मुलांची संख्याही कमी आहे. ही चिंतेची बाब असली तरी उंदराच्या स्नायूंची ताकद आणि वेगाने पळण्याच्या क्षमता आरोग्यदायी पातळीवर असणाºया मुलांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले आहे.
स्पोर्ट्स व्हिलेज स्कूल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौमिल मजमुदार यांनी सांगितले की, शालेय मुले शारीरिदृष्ट्या सदृढ नाहीत. शाळेत शारीरिक शिक्षणाच्या तासांना पुरेसा वेळ द्यायला पाहिजे. सर्व मुलांचा यात अर्थपूर्ण सहभाग असेल अशा वयानुरूप शारीरिक शिक्षण कार्यक्रमांची शाळेत आखणी करणे गरजेचे आहे.
बीएमआय म्हणजे काय?
बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. १८ वर्षांवरील मुला-मुलींच्या वजन आणि उंचीच्या प्रमाणातून बीएमआय काढले जाते. यामधून उंचीच्या तुलनेत शरीराचे अपेक्षित वजन कमी किंवा जास्त आहे का, हे ओळखता येऊ शकते. शरीराचे बीएमआय ठाऊक असणे फार आवश्यक आहे. हा बीएमआय म्हणजे शरीरात बॉडी फॅटचे प्रमाण अधिक असल्याचे व त्यानुसार वजनही अधिक असल्याचा संकेत मिळतो. अपेक्षित बीएमआय नसणे म्हणजे मधुमेह, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण, हृदयविकाराचा धोका, तसेच संधिवाताचे दुखणे ओढावू शकते.