एकाने बेस्टच्या बस रंगवल्या, तर दुसऱ्याने बस स्टॉप! मुंबई चाललेय काय? मुंबई कोणाची...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 09:45 AM2022-03-06T09:45:45+5:302022-03-06T09:46:21+5:30
Mumbai Municipal election: आधी पहारेकऱ्याच्या भूमिकेत शिरलेल्या भाजपने सध्या पालिकेतील भ्रष्टाचारावर फोकस केल्याने पारदर्शी कारभारावर भर दिला आहे. त्याला जोडूनच सत्तांतर नक्की असल्याचे भासवण्यासाठी ‘बदल अटळ येणार कमळ’ हे बिंबवण्याचाही प्रयत्न केला आहे.
- मिलिंद बेल्हे
अवघ्या २२ टक्के मराठी मतांवर मुंबई पालिकेची सत्ता राखता येणार नाही, याचे भान आल्यानंतर शिवसेनेवर सुरुवातीच्या काळात पकड मिळवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आधी ‘मी मुंबईकर’ मोहीम राबवत अमराठी मतांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. पुढे ‘केम छो वरळी’चे वळण घेत भाजपच्या गुजराती मतपेढीला धक्का देण्याचा प्रयत्न केला.
उत्तर भारतीय, पंजाबी, बंगाली, दाक्षिणात्य अशी सारी वळणे घेत शिवसेना फक्त मराठीपुरती उरलेली नाही, हे गेल्या पालिका निवडणुकीत स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण तापताच यंदा शिवसेनेने ‘चलो मुंबई’ असा राष्ट्रभाषेतील नारा दिलाय. त्याचवेळी भाजपने मात्र गुजराती, उत्तर भारतीय मतांपाठोपाठ मराठी मतदारांना चुचकारण्यासाठी मोठ्या मोठ्या बस रंगवत आपली पहिली जाहिरात मोहीम ‘पारदर्शी कारभार, नेतृत्व निर्णायक, सक्षम मुंबईसाठी सशक्त भाजप’ अशी थेट मराठीमोळी केली आहे.
आधी पहारेकऱ्याच्या भूमिकेत शिरलेल्या भाजपने सध्या पालिकेतील भ्रष्टाचारावर फोकस केल्याने पारदर्शी कारभारावर भर दिला आहे. त्याला जोडूनच सत्तांतर नक्की असल्याचे भासवण्यासाठी ‘बदल अटळ येणार कमळ’ हे बिंबवण्याचाही प्रयत्न केला आहे.
काँग्रेस स्वबळावर लढणार असली, तरी त्यांच्या प्रचाराची दिशा अद्याप ठरलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या सोबत पावले टाकणार असल्याने मुस्लिम, उत्तर भारतीय मतांवरच त्यांची भिस्त असेल, असा अंदाज आहे. पण त्यासाठीचे प्रयत्न अद्याप सुरू झालेले नाहीत.
मतांचा पाया विस्तारायचा असेल तर फक्त मराठी मतांवर विसंबून चालणार नाही, हे गृहीत धरून मध्यंतरी उत्तर भारतीयांच्या संमेलनात हजेरी लावून उत्तर भारतीय विरोधक ही आपली प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे मराठी की मुंबईकर, या कात्रीत मनसे सापडलेली दिसते. भाजपशी मनसेची छुपी युती असेल असा संभ्रम आतापासूनच निर्माण करण्यात, तसे संकेत देण्यात भाजप नेते आघाडीवर असल्याने यंदा ‘विकासाची ब्ल्यू प्रिंट’, ‘लाव रे तो व्हिडीओ’ऐवजी मनसे कोणाला टार्गेट करणार ते अजून स्पष्ट झालेले नाही. सध्या तरी चर्चा आहे, फक्त शिवसेना-भाजपच्या जाहिरात मोहिमेची. एकाने बेस्टच्या बस रंगवल्या आहेत, तर दुसऱ्याने बेस्ट बसचे स्टॉप!