"काल एका पक्षानं फुटीरांना ऑफर दिलीय, पण...", राज ठाकरेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 09:03 PM2022-07-24T21:03:38+5:302022-07-24T21:05:00+5:30
शिवसेना कुणाची यावरुन कोर्टात खटला सुरू असल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना कुठल्या ना कुठल्या पक्षात विलीन व्हावच लागणार आहे.
मुंबई-
शिवसेना कुणाची यावरुन कोर्टात खटला सुरू असल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना कुठल्या ना कुठल्या पक्षात विलीन व्हावच लागणार आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही, असा ठाम दावा केला आहे. ते शिवडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना शाखेच्या उदघाटन कार्यक्रमावेळी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना बंडखोर आमदार आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच राज ठाकरेंच्या एका विधानावरही नाव न घेता भाष्य केलं.
"गणपती बाप्पाच्या आगमनाआधी...", उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले आता जगाला समजू द्या!
"अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आजचा जो प्रयत्न आहे तो शिवसेना संपवण्याचा प्रयत्न आहे हे लक्षात घ्या. कारण आज जे कायदातज्ज्ञ सांगत आहेत. आधी दोन-तृतीयांश बहुमताचा नियम होता. पण आता तो राहिलेला नाही. जे फुटलेले आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याखेरीच पर्याय नाही. कालच एका पक्षानं त्यांना ऑफर दिली आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर शिवसैनिकांनी 'केमिकल लोचा' अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. "आता किती जणांचा केमिकल लोचा झाला असेल ते सांगता येत नाही", असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?
शिवसेना पक्ष फुटला तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंमुळेच असा घणाघाती आरोप करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 'झी-२४ तास' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकेल असं वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदे यांचा ४० शिवसेना आमदारांचा गट मनसेत विलीन होणार असल्याच्या शक्यतांवर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली.
गरज पडली तर शिंदे गट मनसेत विलिन करण्यावर विचार करेन; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच दिले स्पष्ट संकेत
"एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार हे माझे जुने सहकारी आहेत. मी माध्यमांतून त्यांचा गट मनसेत विलिन होईल असे ऐकले. या तांत्रिक बाबी आहेत. जर शिंदेंना गरज पडली तर आणि त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर मी त्या ४० आमदारांना मनसेत विलिन करण्याबाबत विचार करेन", असे राज ठाकरे म्हणाले होते.