लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगावच्या जय भवानी एस. आर. ए. इमारतीच्या आग दुर्घटनेतील जखमी रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. गंभीर रुग्णाला कूपर रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. एकूण सात रुग्णांना दोन रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्यासोबत, आगीत भाजलेल्या दोन लहान मुलांना व त्यांच्या आईलाही उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या आगीच्या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे शवविच्छेदन शुक्रवारी संध्याकाळपर्यंत गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या अखत्यारित येणाऱ्या पोस्ट मार्टम सेंटरवर पूर्ण करण्यात आले होते. या दुर्घटनेतील बहुतांश जखमी रुग्णांच्या फुफ्फुसात धूर गेल्याने त्यांना श्वसन विकारच्या व्याधी झाल्या आहेत. काहीजणांना उपचाराचा भाग म्हणून कृत्रिम प्राणवायू दिला जात आहे. काहीजण भाजले होते. त्यांच्यावर उपचार केले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे.
जोगेश्वरीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात २७ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी शुक्रवारी सकाळी दोघांना अधिक उपचारासाठी डिस्चार्ज देण्यात आल्याने त्यापैकी एका रुग्णाला कूपर, तर दुसऱ्या रुग्णाला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले आहे. सध्याच्या घडीला या रुग्णालयात २५ रुग्ण असून त्यापैकी ५ रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे, तर अन्य २० रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
कूपर रुग्णालयात एकूण ८ रुग्ण असून त्यापैकी २ रुग्ण अतिदक्षता विभागात असून त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. त्या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. सहा रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
आई, मुले कस्तुरबा रुग्णालयातकस्तुरबा रुग्णालयात भाजलेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड आहे. त्यामुळे या तिघांना या ठिकाणी आणण्यात आले आहे. त्यामध्ये कल्पना राठोड, त्रिशा राठोड ही अडीच वर्षाची मुलगी, तर मानवीक या तीन महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. या आगीत आईसह ही दोन्ही लहान मुले भाजली होती.
९ रुग्ण खासगी रुग्णालयातया दुर्घटनेतील ९ रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल असून त्यामध्ये प्रत्येकी एका रुग्णाला मातोश्री गोमती हॉस्पिटल आणि सुविधा हॉस्पिटल, तर सात रुग्णांना लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.