Join us

एका रुग्णाची मृत्यूशी झुंज, तर ४ आयसीयूत, गोरेगाव आगीतील इतरांची प्रकृती स्थिर

By संतोष आंधळे | Published: October 08, 2023 7:00 PM

एसआरए आग दुर्घटना : कस्तुरबात आईसह दोन मुलांवर उपचार

मुंबई :गोरेगावच्या जय भवानी एस. आर. ए. इमारतीच्या आग दुर्घटनेतील जखमी रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. गंभीर रुग्णाला कूपर रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. एकूण चार  रुग्णांना दोन रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्यासोबत, आगीत भाजलेल्या दोन लहान मुलांना व त्यांच्या आईलाही उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

या दुर्घटनेतील बहुतांश जखमी रुग्णांच्या फुफ्फुसात धूर गेल्याने त्यांना श्वसन विकारच्या व्याधी झाल्या आहेत. काहीजणांना उपचाराचा भाग म्हणून कृत्रिम प्राणवायू दिला जात आहे. काहीजण भाजले होते. त्यांच्यावर उपचार केले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे.

जोगेश्वरीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात शनिवारी २५  रुग्ण होते. त्यापैकी १० रुग्णांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सध्याच्या घडीला या रुग्णालयात १५ रुग्ण असून त्यापैकी २ रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे, तर अन्य १३ रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

कूपर रुग्णालयात एकूण ८ रुग्ण असून त्यापैकी २ रुग्ण अतिदक्षता विभागात असून त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. त्या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. या रुग्णालयातून २ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्याच्या घडीला एकूण सहा रुग्ण असून ४ रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

आई, मुले कस्तुरबा रुग्णालयात

कस्तुरबा रुग्णालयात भाजलेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड आहे. त्यामुळे या तिघांना या ठिकाणी आणण्यात आले आहे. त्यामध्ये कल्पना राठोड, त्रिशा राठोड ही अडीच वर्षाची मुलगी, तर मानवीक या तीन महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. या आगीत आईसह ही दोन्ही लहान मुले भाजली होती.

सध्याच्या घडीला रुग्णालयातील सर्व रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णांची तब्बेत चांगली आहे. दहा रुग्ण घरी गेले आहेत.    सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. डॉ. राजेश सुखदेवे अधीक्षक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय 

एक रुग्णाची प्रकृती चिंताजनक सोडली तर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या ठिकाणी डॉक्टर रात्रंदिवस त्याची काळजी घेत आहेत.डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता (कूपर रुग्णालय)

टॅग्स :गोरेगावआग