बारावी पेपर लीक प्रकरणात नगरमधून एक जण ताब्यात
By मनीषा म्हात्रे | Published: March 5, 2023 10:51 PM2023-03-05T22:51:17+5:302023-03-05T23:38:50+5:30
दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारवरून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बारावी पेपर लीक प्रकरणात नगर मधून एक जण ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी जवळपास पाऊणतास आधी दादरमधील एका परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना मोबाईलवर मिळाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी नगर मधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याबाबत त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा दावा राज्यमंडळाने केला आहे. मात्र, परीक्षा सुरू होण्यापूर्वी जवळपास पाऊणतास आधी बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर पाठवल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने नगर येथून एकाला ताब्यात घेतले आहे.
दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारवरून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजी पार्क पोलिसांनी शनिवारी विज्ञान शाखेच्या बारावीच्या गणिताच्या पेपरमध्ये कॉपी आणि गैरप्रकार केल्याप्रकरणी तीन परीक्षार्थींसह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. परीक्षा केंद्रात या विद्यार्थ्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला होता. दहा वाजून १७ मिनिटांनी त्याला प्रश्नपत्रिकेचा काही भाग मिळाल्याचे मोबाईल पाहणी करता उघड झाले होते. याप्रकरणी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेने नगर मधून एकाला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत असून अधिक तपास सुरू आहे.
असे झाले उघड
परीक्षा केंद्रप्रमुखांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पेपर संपल्यानंतर एका वर्गाच्या पर्यवेक्षकाने त्यांच्याशी संपर्क साधून, परीक्षा हॉलमध्ये एका विद्यार्थ्याला मोबाईलसह पकडण्यात आल्याचे सांगितले." विद्यार्थ्यांना त्यांचा मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नसतानाही तो मोबाईल घेवून गेला. मोबाईलची तपासणी करताच, त्या विद्यार्थ्याला सकाळी १०.१७ वाजता प्रश्नपत्रिकेचे काही भाग मिळाले असल्याचे दिसून आले. त्याच्या चौकशीत, मित्राने त्याला हा पेपर शेअर केल्याचे सांगितले. त्यानंतर, त्यानेही अन्य मित्रांना ही प्रश्नपत्रिका शेअर केल्याचे दिसून आले. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी नऊ मिनिटे आधी एका अज्ञात व्यक्तीने त्याची उत्तरे दादर केंद्रातील विद्यार्थ्यासोबत शेअर केल्याचे समोर येताच त्या हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.