Join us

मध्य वैतरणा धरणातून पाणी सोडल्याने एक जण वाहून गेला; सावर्डेतील पुलावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 10:12 AM

एका मुलीला वाचविण्यात यश

खोडाळा - मध्य वैतरणा धरणक्षेत्रालगतच्या कोचाळे, करोळ, पाचघर व सावर्डेसह इतर गावांना कोणतीही पूर्वसूचना न देता शनिवारी संध्याकाळी धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीच्या वाढलेल्या प्रवाहात दोन जण वाहून गेले. यातील एकाला वाचविण्यात यश आले असून, दुसऱ्याचा शोध अद्याप लागलेला नाही.

या दुर्घटनेतून वाचविण्यात आलेल्यामध्ये ऋचिका भाऊ पवार (८) हिचा समावेश आहे तर भास्कर नाथा पादीर (४०) यांचा शोध सुरू आहे. शनिवारी संध्याकाळी शहापूर तालुक्यात कामासाठी गेलेले लोक मोखाडा तालुक्यातील सावर्डे गावी पायी परतत असताना ही दुर्घटना घडली. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतर येथील पुलावरून पाणी वाहू लागते. 

जीवरक्षक तैनात करण्याची गरजमुळात या धोकादायक पुलाच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधण्याची मागणी ग्रामस्थ गेली अनेक वर्ष करत आहेत. त्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानेही कोणतीही सुरक्षा व्यवस्था केलेली नसल्याची नाराजी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तसेच जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन येथे अत्यावश्यक बाब म्हणून कायमस्वरूपी जीवरक्षक दल तैनात करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

काठावरच्या ग्रामस्थांनी दिला हात शनिवारी सायंकाळी अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला, तेव्हाही लोक पूल ओलांडून घरी जात होते. यावेळी भास्कर पादीर व ऋचिका ही आठ वर्षांची मुलगी असे दोघे पुलावरून चालले होते. प्रवाह वाढल्याचा अंदाज आल्याने भास्कर पादीर यांनी ऋचिकाला खांद्यावर उचलून घेतले. परंतु, पाण्याचा जोर जास्त असल्याने त्यांना तोल सांभाळता आला नाही आणि ते वाहून गेले. यावेळी अगदी शेवटच्या क्षणी काठावरील ग्रामस्थांनी ऋचिकाला हात देत पकडले आणि तिला सुखरूप बाहेर काढले. मात्र, भास्कर यांना वाचवता आले नाही.