Join us

साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस, सुरक्षेची जबाबदारी तुटपुंज्या मनुष्यबळावर ; १९ ते २० टक्के पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 3:01 AM

Mumbai Police News : मुंबई पोलीस दलासाठी मंजूर पदांपैकी १९ ते २० टक्के पदे अद्यापही रिक्त आहेत. सध्या साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस असे चित्र आहे.

मुंबई : अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी  मुंबई पोलिसांच्या तुटपुंज्या मनुष्यबळाच्या खांद्यावर आहे. मुंबई पोलीस दलासाठी मंजूर पदांपैकी १९ ते २० टक्के पदे अद्यापही रिक्त आहेत. सध्या साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस असे चित्र आहे. राज्यभरात होणाऱ्या मेगा पोलीस भरतीतून किमान ही   तफावत कमी होईल, अशी आशा पोलिसांना आहे. मुंबईची लोकसंख्या पावणेदोन कोटी आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी मात्र अवघा ४० ते ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा कार्यरत आहे. प्रजा संस्थेच्या अहवालानुसार, २०१८ मध्ये मुंबई पोलीस दलात ५० हजार ६०६ पदे मंजूर होती. त्यापैकी ३९ हजार ५६१ जण कार्यरत होते. यात २२ टक्क्यांची तफावत आहे. त्याच तुलनेत २०१९ मध्ये मुंबईत मंजूर ५० हजार ४८८ पदांपैकी ४१ हजार ११५ जणांचा फौजफाटा कार्यरत आहे. कार्यरत पोलिसांपैकी बंदोबस्तासाठी सर्वाधिक मनुष्यबळ अडकून असते. त्यामुळे सर्वाधिक ताण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळावर पडत आहे. मात्र, मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत याचे प्रमाण फार कमी आहे. एकूण मनुष्यबळाच्या किमान दुप्पट मनुष्यबळ मुंबई पोलिसांकडे असणे गरजेचे असल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आहे.  अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर ताणयातही पोलीस निरीक्षक १६ टक्के, सहायक पोलीस निरीक्षक ४१ टक्के, पोलीस उपनिरीक्षक २८ टक्के, तर सहायक पोलीस उपनिरीक्षक २९ टक्क्यांनी मंजूर पदांपेक्षा कमी आहे. यातही टेक्निकल पोस्टकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. जिथे ५ हजार पदे मंजूर असताना अवघ्या २ हजार ८४४ मनुष्यबळावर काम सुरू आहे. याचा फटका गुह्यांचा तपासावर होत आहे. अशात राज्यभरात होणाऱ्या मेगा पोलीस भरतीतून किमान ही तफावत कमी होईल अशी आशा पोलिसांना आहे. सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदांमध्ये सर्वाधिक ४१ टक्के तफावत असल्याचे प्रजाच्या अहवालातून समोर आले.  पहिल्या टप्प्यात ५३०० पदांची भरतीपहिल्या टप्प्यातील ५३०० पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरू झाली आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले, तसेच पुढे टप्प्यानुसार, ही भरती प्रक्रिया पार पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबई पोलीसमुंबई