मुंबई : मेट्रो-२ ब मार्गावरील कुर्ला टर्मिनस हे स्थानक कमी करण्यात आल्याची माहिती प्राप्त झालयानंतर लोकप्रतिनिधींनी याबाबत नाराजी व्यक्त करत कुर्ला टर्मिनस का वगळले? असा सवालही केला आहे. आणि कुर्ला पूर्व येथील इमारत क्रमांक ८१, ८२ आणि ८३ जी मेट्रो २ ब मुळे प्रभावित होत आहे. याबाबत योग्य कार्यवाही करण्यात यावी. कुर्ला पूर्व येथील मेट्रो स्टेशन परिसर सुशोभित करत सर्व अडथळे दूर करण्यात यावे. दोन वेळा मूळ आराखड्यात केलेल्या बदल बाबत आश्चर्य व्यक्त करत एमएमआरडीएचा दावा योग्य असेल तर सर्वंकष प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी सल्लागाराला दिलेले कोट्यवधी रुपयांचे शुल्क वसूल करावे, असेही म्हणणे मांडण्यात आले आहे.
भविष्यात येथून जाणा-या मेट्रो-२ ब मधील कुर्ला टर्मिनस हे स्थानक आणखी अत्याधुनिक करण्यावर भर देण्याची गरज आहे. मात्र प्राधिकरणाने हे स्थानकच कमी केल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी शनिवारी मेट्रोचे प्रकल्प संचालक पीआरके मूर्ती यांची भेट घेत वरील म्हणणे मांडले. दरम्यान, कुर्ला टर्मिनसच्या परिसरात केवळ कुर्ला रेल्वे स्थानक नसून, विद्याविहार, घाटकोपरसह चेंबूरसारखे महत्त्वाचे परिसर येतात. याव्यतीरिक्त बाहेरगावाहून येथे असंख्य गाड्या दाखल होतात. आणि बाहेरगावी सुटतातदेखील. परिणामी दिवसाचे २४ तास कुर्ला टर्मिनस प्रवाशांनी भरून वाहत असते. मुळात एमएमआरडीएने यासाठी जाहीर नोटीस देत जनतेच्या सूचना, हरकती आणि आक्षेप मागविले पाहिजेत. मात्र यापैकी काहीच झालेले नाही.