मुंबई, दि. 4 - रेल्वे प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली स्वस्तातील एक रुपयात उपचार सुविधा बंद होण्याची शक्यता आहे. यासाठी रेल्वे स्थानकांवर दवाखानेही सुरु करण्यात आले होते. मात्र आता हे दवाखाने बंद होणार असल्याची संकेत मिळाले आहे. वन रुपी क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल घुले यांनी रेल्वेला यासंबंधी पत्र लिहून सूचना दिली आहे. 'डिपॉजिट भरलं असतानाही रेल्वने अद्याप 11 स्थानकांवर दवाखाना सुरु करण्यासाठी जागा दिलेली नाही', अशी तक्रारच डॉ राहुल घुले यांनी केली आहे.
अशा परिस्थितीत वन रुपी क्लिनिक सुरु ठेवणं शक्य नसून ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलआ आहे. तीन दिवसांमध्ये ही सेवा बंद करण्यात येणार आहे. 'प्रवाशांकडे कोणतीही तक्रार न करता उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. शिवाय एकाही व्यक्ती किंवा प्रवाशाने उपचारासंबंधी रेल्वेकडे तक्रार केलेली नाही', असा दावा क्लिनिकने केला आहे.
मॅजिक दिल आणि सेंट्रल रेल्वेने हातमिळवणी करत सेंट्रल आणि हार्बर लाईनवरील आठ स्थानकांवर वन रुपी क्लिनिकची सुरुवात केली होती. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला होता. 10 मे रोजी घाटकोपर स्थानकातून या सुविधेला सुरुवात करण्यात आली होती. नंतर हळूहळू विस्तार वाढवत 19 स्थानकांवर हे क्लिनिक सुरु करण्याचा मानस होता.
'रेल्वेने 19 स्थानकांसाठी 19 लाख रुपये डिपॉजिट म्हणून आमच्याकडे घेतले आहेत. मात्र अद्याप फक्त आठ स्थानकांवरच आम्हाला क्लिनिक सुरु करण्यासाठी जागा देण्यात आली आहे', अशी माहिती डॉ राहुल घुले यांनी दिली आहे. सध्या दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, मुलुंड, वडाळा रोड, वाशी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकांवरच वन रुपी क्लिनिक सेवा दिली जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वन रुपी क्लिनिक झोपडपट्ट्यांमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी चार जागांची निवड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमाबाई आंबेडकर नगर, धारावी, बेहरामपाडा आणि कुरार विलेजमध्ये हे क्लिनिक सुरु करण्यात येईल. सरकारी रुग्णालयांमध्ये लागलेल्या लांब रांगा आणि खासगी दवाखान्यांमध्ये आकारण्यात येणारा खर्च न परडवणा-यांसाठी वन रुपी क्लिनिक खूपच फायद्याचं ठरलं होतं.
115 दिवस चाललेल्या वन रुपी क्लिनिकमध्ये एकूण 20 हजार लोकांवर उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे ट्रेन दुर्घटनेत जखमी झालेल्या 200 लोकांचा जीव या क्लिनिकमुळे वाचला होता.