‘वन रुपी क्लिनिक’ महाराष्ट्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 05:07 AM2017-08-07T05:07:11+5:302017-08-07T05:07:26+5:30
मुंबईतील मध्य रेल्वेच्या स्थानकांवर सुरू झालेल्या ‘वन रुपी क्लिनिक’चा लवकरच विस्तार होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या या मोहिमेचा शुभारंभ आॅगस्ट महिन्यापासून हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि पनवेल स्थानकांवर होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वेच्या स्थानकांवर सुरू झालेल्या ‘वन रुपी क्लिनिक’चा लवकरच विस्तार होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या या मोहिमेचा शुभारंभ आॅगस्ट महिन्यापासून हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि पनवेल स्थानकांवर होणार आहे. याशिवाय, महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून सप्टेंबर महिन्यात ‘वन रुपी क्लिनिक’ बिहारमध्येही प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे.
‘वन रुपी क्लिनिक’मधील दोन महिन्यांतील बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांचे जवळपास २५ लाख रुपये वाचल्याचा दावा त्यांनी केला आहे. या दोन महिन्यांत जास्तीत जास्त रुग्ण रक्त चाचणी, सिटी स्कॅन, एमआरआय आणि यूएसजीसारख्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आल्याचे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले. तसेच, ५०हून अधिक आपत्कालीन घटनांमध्ये क्लिनिकच्या डॉक्टरांनी सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले. या क्लिनिकच्या अनोख्या संकल्पनेमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गातील सामान्यांच्या डोक्यावरील आरोग्यसेवेचा आर्थिक भार खूप कमी झाल्याचेही ते म्हणाले.
मेट्रो व्यवस्थापनानेही या क्लिनिकविषयी सकारात्मकता दर्शविली आहे. राज्यातील प्रमुख एसटी स्टँडवरही या क्लिनिकचे काम सुरू आहे. पुण्यातील स्वारगेट येथे या क्लिनिकची सुरुवात होईल. सप्टेंबर महिन्यांत ‘वन रुपी क्लिनिक’ बिहारमध्येही प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. या क्लिनिकमध्ये रात्रंदिवस एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर्स उपस्थित असतील.
या क्लिनिकमध्ये बाह्य रुग्ण विभाग, पूर्ण बॉडी चेकअप, रक्त तपासण्या, हृदय-रक्तदाब-मधुमेह-कर्करोग यांसाठी विशेष विभाग, आदी सेवा रुग्णांना पुरविण्यात येतील. तसेच, वैद्यकीय चाचण्याही निम्म्या किमतीत करण्यात येतील.