Join us  

‘वन रुपी क्लिनिक’ सुरूच राहणार

By admin | Published: May 26, 2017 12:47 AM

मध्य रेल्वेने सुरू केलेल्या आपत्कालीन वैद्यकीय कक्ष (ईएमआर) उपक्रमांतर्गत वन रुपी क्लिनिक सुरूच राहणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मध्य रेल्वेने सुरू केलेल्या आपत्कालीन वैद्यकीय कक्ष (ईएमआर) उपक्रमांतर्गत वन रुपी क्लिनिक सुरूच राहणार आहे. मध्य रेल्वे आणि मॅजिकडील यांच्यातील वाद अखेर शमला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आर. के. गोएल यांनी गुरुवारी दिली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना यापुढेही एका रुपयात उपचार घेता येणार आहेत.रेल्वेकडून देण्यात आलेल्या जागेपेक्षा अतिरिक्त जागेत बांधकाम केल्याचे कारण देत दादर येथील वन रुपी क्लिनिकची फार्मसी तोडण्याचे आदेश मरेने दिले होते. त्यामुळे वन रुपी क्लिनिकचे सीईओ डॉ. राहुल घुले यांनी फार्मसी बांधकामावर तोडक कारवाई केली. लाखो रुपये खर्च करून परवानगीसह बांधण्यात आलेल्या फार्मसीवर कारवाई केल्यामुळे डॉ. घुले यांनी हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हॉकर्सच्या स्टोअर रूमच्या पडीक जागेत ही फार्मसी उभारण्यात आली होती. यासाठी डॉ. घुले यांना रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगीसाठी विचारणा केली होती. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ‘तोंडी’ परवानगी दिल्याची माहिती डॉ. घुले यांनी दिली. मात्र बुधवारी रात्री उशिरा मध्य रेल्वेच्या अन्य अधिकाऱ्यांनी दादर येथील वन रुपी क्लिनिकला भेट दिली. त्यावेळी हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत फार्मसी कक्ष तोडण्यास सांगितले. घुले यांना त्या बांधकामावर नाइलाजास्तव हातोडा चालवावा लागला.वाद शमला, ‘चर्चेला’ उधाण आलं जी...मध्य रेल्वे वर्षभरात १९ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारणार आहे. मात्र विविध स्थानकांत किती स्क्वेअर फूट जागा देण्यात येणार आहे याचा स्पष्ट उल्लेख करारात नाही. एका रुपयात मिळणाऱ्या सुविधेमुळे वैद्यकीय सुविधा पुरवणाऱ्या अन्य व्यवस्थेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची सुविधा बंद करण्याचा दबाव विशिष्ट गट निर्माण करत असल्याची चर्चा रेल्वे वर्तुळात रंगली आहे.