‘एक रुपया’तील उपचार महागणार; पुढील महिन्यापासून १० टक्के शुल्क वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 11:27 AM2023-10-03T11:27:16+5:302023-10-03T11:28:04+5:30
सात वर्षांत एक रुपयाची वाढ नाही
मुंबई : मुंबईत रेल्वेप्रवासादरम्यान अपघात झाल्यास किंवा शारीरिक त्रास उद्भवल्यास तत्काळ नाममात्र दरात उपचार मिळावेत, याकरिता रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर ‘वन रुपी’ क्लिनिक सुरू केले आहेत. वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा वाढता डोंगर लक्षात घेता अवघ्या एक रुपयात रुग्णांना उपचार देणारी वन रुपी क्लिनिक सेवा महागणार आहे. एक रुपयामध्ये वैद्यकीय तपासणी, अन्य खासगी सेवांच्या तुलनेत सत्तर टक्के कमी दरामध्ये इतर वैद्यकीय तपासण्या, जागीच निदान करण्याची सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यात आली होती.
वन रुपी क्लिनिकचे राहुल घुले यांनी सांगितले की, औषधांच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन ही औषधेही माफक दरात उपलब्ध करून देण्याचेही वन रुपी क्लिनिकने प्रयत्न केले. या केंद्रामुळे रेल्वे परिसरात होणारे अपघात तसेच प्रसूतीसाठीही तत्काळ मदत मिळाली होती. आता खर्च वाढला आहे. त्यामुळे सध्याच्या दरात क्लिनिक चालवणे परवडत नाही. त्यामुळे दहा टक्के दर वाढवले जाणार आहेत. परंतु, रुग्णावर त्यामुळे जास्त आर्थिक बोजा पडणार नाही. सीबीसी चाचणी ९० रुपये आहे, ती १०० रुपये होईल. पुढील महिन्यापासून नवीन दर लागू होतील.
कुर्ला स्थानकातील वन रुपी केंद्राला भेट दिली असता एकही रुग्ण दिसला नाही. हे केंद्र अडगळीत असल्यामुळे रुग्ण कमी येत आहेत. दिवसाला केवळ दहा ते बारा रुग्ण येतात असे डॉ. सदाफ मोनिन यांनी सांगितले. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे.
गेल्या सात वर्षांत एकही रुपयाची वाढ केली नाही. परंतु, आता त्यामध्ये खर्च भागवणे शक्य नाही. त्यामुळे पुढील महिन्यापासून सर्व शुल्कात १० टक्के वाढ केली जाणार आहे.
७ वर्षांत ६ लाख जणांनी घेतला लाभ
सात वर्षांत मुंबई महानगर क्षेत्रात २३ केंद्रांमध्ये सहा लाख जणांनी या सेवेचा लाभ घेतला.
दरम्यान, कांदिवली आणि मानखुर्द स्थानकात सर्वांत चांगला प्रतिसाद आहे, तर कुर्ला स्थानकात हे केंद्र अडगळीत असल्याने अल्प प्रतिसाद मिळत आहे.
सर्व ठिकाणी ४६ बीएएमएस डॉक्टर
वन रुपी केंद्रात केवळ दादर स्थानकात एक एमबीबीएस डॉक्टर होते ते केंद्र बंद झाले आहे. मुंबई महानगर क्षेत्रात वन रुपीची २३ केंद्रे असून, या केंद्रांमध्ये दोन पाळ्यांमध्ये काम चालते. सकाळी आठ ते रात्री आठ आणि रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत एक डॉक्टर आणि एक नर्स केंद्रात असतात.
वन रुपी केंद्रे ठिकाण दररोज
सरासरी रुग्ण
कुर्ला १०-१२
ग्रॅन्टरोड ३०-४०
भांडुप २५-३०
चेंबूर ३०- ४०
अंधेरी ३०-४०
मालाड २५-३०
कांदिवली ४०-५०
मानखुर्द ४०-५०
सध्याचे दर
तपासणी शुल्क १
रक्तदाब तपासणी मोफत
रक्तातील साखर तपासणी २५
नेब्युलायझर शुल्क ३०
इसीजी शुल्क ५०
ड्रेसिंग शुल्क ५०
सलाईन शुल्क ५०