मुंबई : ‘प्रत्येक विभागाचे एकेक राजे आणि प्रत्येक विभागात एकेक वाझे’ अशी राज्य सरकारची अवस्था झाली आहे. बऱ्याच विभागांतील ‘वाझें’चे पत्ते माझ्याकडे आले आहेत. लवकरच ते जनतेसमोर आणू, अशा शब्दात महाविकास आघाडी सरकारमधील घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिला.
भाजप प्रदेश कार्यसमितीच्या समारोपप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले, अशा वाझेंचे पत्ते आम्हाला सांगता येऊ नये म्हणून अधिवेशन दोन दिवसांचे घेण्याचा घाट घातला जात आहे. या सरकारने विधिमंडळ बंद केले. लोकशाहीची दारं बंद केली असली तरी लोकशाही पुनर्स्थापित कशी करायची, हे ठाऊक आहे.
कोरोनाच्या काळातील भ्रष्टाचार व विविध प्रश्नांवर सरकारचा बुरखा फाडण्याचे काम भाजप करेल, असेही ते म्हणाले. सर्वाधिक मृत्यू राज्यात झाले. महाराष्ट्राचे मॉडेल हे तर मृत्यूच्या सापळ्याचे मॉडेल आहे. या सरकारसाठी मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे तरी का? असा सवाल त्यांनी केला.
ओबीसींना आरक्षणासाठी कुठल्याही स्तराला जाऊ
ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ. फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवून राजकारण करणे, हे एकमेव काम सरकार करते आहे. या सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला. ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. ते मिळविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. - देवेंद्र फडणवीस