मुंबई - माजी एनसीबी ऑफिसर आणि सनदी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने त्यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप ठेवत त्यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली. मुंबईतील कॉर्डिलिया क्रूझवर सापडलेल्या अमली पदार्थ प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यास अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा ठपका ठेवत सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर ठेवला आहे. त्यानंतर, समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया देताना, मला देशभक्त असल्याची शिक्षा मिळतेय असं म्हटलं होतं. आता, मदर्स डे दिवशी पुन्हा एकदा त्यांनी ट्विटरवरुन पोस्ट केली आहे, त्याचीही चर्चा रंगली आहे.
सदर प्रकरणावर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. सीबीआयने माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि १२ तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेतली. माझ्या घरातून त्यांना १८ हजार रुपये रोकड आणि मालमत्तेची ४ कागदपत्रं सापडली आहे. संबंधित मालमत्ता मी सेवेत रुजू होण्यापूर्वी विकत घेतली होती. मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळतेय, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने अंधेरीतील माझ्या वडिलांच्या घरावर छापा टाकला, पण त्यांना काहीही सापडलं नाही, असा दावाही त्यांनी केला. त्यानंतर, आता मदर्स डे दिवशी समीर यांनी त्यांच्या आईसमवतेचा फोटो शेअर केला आहे. तसेच, आईने मला चांगली शिकवण दिली आहे.
स्वीकृती, सहिष्णुता, शौर्य, करुणा. या गोष्टी माझ्या आईने मला शिकवल्या आहेत. माझ्या आईचे शब्द सतत माझ्या कानात गुंजतात की, माझा मुलगा हजारोच्या बरोबरीचा आहे. आईची हीच प्रेरणा प्रत्येक आव्हान आणि संघर्षासाठी मला ऊर्जा देते, असे समीर वानखेडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी आईसोबतचा बालपणीचा फोटोही शेअर केला आहे.
दरम्यान, सीबीआयने समीर वानखेडेंसह नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अन्य दोन अधिकारी, या प्रकरणातील पंच किरण गोसावी आणि अन्य काही जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली सीबीआयने गुन्हाही दाखल केला आहे. याप्रकरणी २५ कोटींपैकी ५० लाख रुपयांची लाच वानखेडे व त्यांच्या पथकाने स्वीकारल्याचा ठपकाही सीबीआयने ठेवला. सदर प्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वानखेडे यांच्या मुंबईतील ओशिवरा येथील निवासस्थानासह दिल्ली, रांची, कानपूर, लखनौ, गुवाहाटी, चेन्नई अशा २९ ठिकाणी छापेमारी केली आहे. आर्यन खान प्रकरणात लाचखोरी झाल्याचा तपास करण्यासाठी एनसीबीने सीबीआयला पत्र लिहिले होते.
प्रकरण काय?
एनसीबीच्या मुंबईतील विभागीय संचालकपदी असताना समीर वानखेडे यांनी ३ ऑक्टोबर २०२१ रोजी कॉर्डिलिया क्रूझवर छापेमारी केली होती.
क्रूझवरून अमली पदार्थांचा साठा जप्त करतानाच क्रूझवर जाणाऱ्या आर्यन यालाही अटक केली होती.
आर्यनला अटक न करण्यासाठी वानखेडे आणि त्यांच्या पथकाने २५ कोटींची लाच मागितल्याचा ठपका सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे.
क्रूझवरील कारवाईनंतर समीर वानखेडे हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आर्यन प्रकरणातही त्यांनी अनेक प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्या नसल्याचा ठपका त्यांच्यावर होता.
या प्रकरणी त्यांच्यासह एनसीबीच्या सात अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झाली होती.
यानंतर एनसीबीने सीबीआयला पत्र लिहून वानखेडे व त्यांच्या पथकातील लोकांची भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करण्यास सांगितले होते.
कूझ प्रकरणी आर्यन खान याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने मे २०२२ मध्ये त्याची निर्दोष मुक्तता केली होती.