Join us

आरे कॉलनीत राबवला जातोय ‘एक बीज एक सावली’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 2:24 AM

३०० रोपांची लागवड : उपक्रमातून जोडले गेले ६०० पर्यावरणप्रेमी, वृक्षतोडीला वृक्षांच्या लागवडीतून दिले उत्तर

मुंबई : आरेतील मेट्रो ३च्या कारशेडसाठी रातोरात झाडांची कत्तल करण्यात आली. झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आंदोलन पुकारले असून ते आजतागायत सुरू आहे., परंतु आंदोलक वृक्षारोपणाचे काम का हाती घेत नाही, असे एकीकडे बोलले जाते. यावेळी आरेतील आंदोलकांनी ‘एक बीज एक सावली’ या उपक्रमांतर्गत आरेमध्ये ३०० रोपांची लागवड करून सकारात्मक उत्तर दिले आहे. या उपक्रमात सुमारे ६०० पर्यावरणप्रेमी जोडले गेले आहेत.

पर्यावरणप्रेमी संजीव शामतुला म्हणाले की, ‘एक बीज एक सावली’ या उपक्रमातून जॅकफू्रट, जांभूळ, काटेसावर, चिंच, पपई इत्यादी रोपांची लागवड आरेमध्ये करण्यात आली. काटेसावर हे झाड खूप उपयुक्त असून, या झाडांवर ४० विविध प्रजातींचे पक्षी आढळून येतात. चार महिन्यांमध्ये ४ हजार ८०० रोपे तयार केली. त्यातली ३०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. उपक्रमामार्फत मोफत रोप दिली जातात. सध्या जास्तीतजास्त रोपटी तयार करण्याचे काम सुरू आहे.

नागरिकांना किंवा मंडळांना मोफत रोप दिली जातात. यावेळी नागरिकांचा सामाजिक उपक्रमात हातभार लागावा, यासाठीत्यांच्याकडून रोपाच्या बदल्यात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन केले जाते.वर्षांमध्ये जमा केलेले शैक्षणिक साहित्य शहीद भगत सिंह जयंतीनिमित्त नुकतेच १२० आदिवासी मुलांना देण्यात आले. दरम्यान, मिलिंद तावडे, सचिन रहाटे, श्रेयश लोणकर, लक्ष्मी बोमीडी इत्यादी पर्यावरणप्रेमींच्या हातभारामुळे उपक्रमाला गती मिळत आहे.उपक्रमातून विद्यार्थ्यांना मदत‘एक बीज एक सावली’ हा उपक्रम २०१७ पासून सुरू झाला. बीज गोळा करून त्यातून संस्थेच्या आवारामध्ये रोपे तयार केली जातात. ही रोपे शाळा, महाविद्यालये, संस्था व संघटनांना देऊन गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी आवाहन केले जाते. रोपामागे एका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची मदत मागितली जाते. या उपक्रमातून एका बाजूने वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना मदत अशी दोन महत्त्वाची कामे होतात. आतापर्यंत १२० ते १३० गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविली आहे.- सचिन रहाटे, संस्थापक, एक बीज एक सावली 

टॅग्स :मुंबईआरे