अहंकारी सरकारचे एकांगी आणि तुघलकी निर्णय - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:24 AM2020-12-14T04:24:18+5:302020-12-14T04:24:18+5:30
अहंकारी सरकारचे एकांगी, तुघलकी निर्णय देवेंद्र फडणवीस : संधी मिळेल तिथे जाब विचारू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील ...
अहंकारी सरकारचे एकांगी, तुघलकी निर्णय
देवेंद्र फडणवीस : संधी मिळेल तिथे जाब विचारू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेले अहंकारी सरकार आहे. एकांगी आणि तुघलकी निर्णय घेणाऱ्या या सरकारला संधी मिळेल तिथे जाब विचारू, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली, तसेच समाजातील कोणत्याच घटकाला प्रतिसाद न देणाऱ्या सरकारचा चहा घेता येणार नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्काराची घोषणा केली.
दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शेतकरी, कोरोना काळातील बळी, महिलांवरील वाढते अत्याचार, मराठा आणि ओबीसी आरक्षण, तसेच विकासकामांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रासपचे महादेव जानकर यांच्यासह भाजप आमदार उपस्थित होते.
देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाही महाराष्ट्रातील बळींची संख्या जास्त आहे. आतापर्यंत ४८ हजार बळी गेले. खरे तर कोरोना काळातील सरकारच्या कारभाराचा पंचनामाच व्हायला हवा. संकट काळ असल्याने आम्ही संयमाची भूमिका घेतली. दुर्दैवाने कोरोनाबाबतच्या कामातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, अशी चिंताजनक स्थिती असतानाही मुख्यमंत्री लाट थोपविल्याचे सांगत स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. पोलीस संरक्षण असलेल्या कोविड सेंटरमध्येही बलात्कार, विनयभंगाच्या घटना घडत आहेत. सरकार शक्ती कायदा आणणार असल्याचे समजते, पण इतक्या महत्त्वाच्या कायद्याच्या सभागृहात चर्चा व्हायला हवी. परिणामकारक कायद्यासाठी ते आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.
चर्चेपासून पळ काढणारे सरकार अशीच या सरकारची इतिहासात नोंद होणार आहे. समाजातील कोणत्याही घटकाला जे प्रतिसाद देत नाही, अशा सरकारच्या चहापानाला जाता येणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. राजकीय मेळावे, कार्यक्रम सुरू झाले असताना अधिवेशनाला विरोध, ही भूमिका अनाकलनीय आहे. मागच्या अधिवेशनाप्रमाणे यावेळीही सत्ताधाऱ्यांच्या गोंधळात वेळ वाया जाण्याची शक्यता फडणवीस यांनी बोलून दाखविली.
* राज्याची सामाजिक घडी विस्कटतेय. महाविकास आघाडीतील पक्ष ठरवून राजकीय नाट्य करत आहेत. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक विसंगत भूमिका वठविल्या जात आहेत. एक पक्ष बाजूने बोलतो, दुसरा विरोधात आणि तिसरा तटस्थ अशी विसंगत भूमिका रंगविली जात आहे. त्यातून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कधी नव्हे, ती आज राज्याची सामाजिक घडी विस्कटत असल्याचा असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.
..................